

नवी दिल्ली, पुढारी वृत्तसेवा : रेल्वे कर्मचाऱ्यांना 78 दिवसांचा बोनस देण्याचा निर्णय केंद्रीय मंत्रिमंडळाने बुधवारी घेतला. रेल्वेच्या एकूण 11.27 लाख कर्मचाऱ्यांना उत्पादकता आधारित बोनसच्या निर्णयाचा लाभ होणार आहे. कर्मचाऱ्यांना दिली जाणारी बोनसची कमाल रक्कम 17 हजार 951 रुपये इतकी असेल तसेच बोनसपोटी रेल्वेला 1 हजार 832 कोटी रुपयांची तरतूद करावी लागेल. (Bonus for Railway Employees)
रेल्वेचे चालक, गॅंगमन, गार्डस, स्टेशन मास्तर, पर्यवेक्षक, तंत्रज्ञ, तंत्रज्ञ मदतनीस, कंट्रोलर, पॉईंटसमन, रेल्वे मंत्रालयातले कर्मचारी तसेच ग्रुप 'सी मधील कर्मचाऱ्यांना हा बोनस मिळेल. दरवर्षी बोनसची घोषणा दसऱ्याआधी केली जाते. मात्र यावेळी ही घोषणा दसऱ्यानंतर झाली आहे. कोरोना संकटामुळे गेल्या वर्षी रेल्वेला मोठे आर्थिक नुकसान झाले होते. मात्र असे असूनही कर्मचाऱ्यांना भरीव बोनस देण्यात आला असल्याची माहिती केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांनी पत्रकारांशी बोलताना दिली.
गुजरातमधील कांडला येेथे दीनदयाळ पोर्ट अॅथॉरिटी अंतर्गत एक नवीन कंटेनर टर्मिनल तसेच बहुउद्देशीय कार्गो बर्थ बनविण्याचा निर्णयही मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. या दोन्ही प्रकल्पांसाठी सुमारे सहा हजार कोटी रुपयांचा खर्च येणार आहे.
केंद्र सरकारने ईशान्य भारताच्या विकासासाठी 'पीएम डिव्हाईन' योजनेला मंजुरी दिली आहे. पुढील चार वर्षांच्या कालावधीत ही योजना राबविली जाणार असल्याचे अनुराग ठाकूर यांनी एका प्रश्नाच्या उत्तरात सांगितले.