

पुढारी डेस्क : दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेतील उर्वरित सामन्यांसाठी (South Africa vs India ODI series) भारतीय संघात दीपक चहर याच्या जागी वॉशिंग्टन सुंदरचा समावेश करण्यात आला आहे. भारत दक्षिण आफ्रिकेविरुद्ध ९ ऑक्टोबर रोजी रांची येथे दुसरा एकदिवसीय सामना खेळेल. तर ११ ऑक्टोबर रोजी नवी दिल्ली येथे मालिकेतील शेवटचा एकदिवसीय सामना खेळणार आहे.
अखिल भारतीय वरिष्ठ निवड समितीने दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या उर्वरित एकदिवसीय मालिकेसाठी दीपक चहरच्या जागी वॉशिंग्टन सुंदरची निवड केली असल्याचे बीसीसीआयने (BCCI) म्हटले आहे. इंदूरमध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्ध झालेल्या तिसऱ्या आणि अंतिम T20I सामन्यानंतर चहरला पाठदुखीचा त्रास जाणवला होता. यामुळे लखनौमधील पहिल्या एकदिवसीय सामन्यात त्याचा भारताच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये समावेश नव्हता. तो आता राष्ट्रीय क्रिकेट अकादमीत (एनसीए) वैद्यकीय पथकाच्या देखरेखीखाली राहील, असे बीसीसीआयने नमूद केले आहे.
शिखर धवन (कर्णधार), रुतुराज गायकवाड, शुभमन गिल, श्रेयस अय्यर (उपकर्णधार), रजत पाटीदार, राहुल त्रिपाठी, इशान किशन (यष्टीरक्षक), संजू सॅमसन (यष्टीरक्षक), शाहबाज अहमद, शार्दुल ठाकूर, कुलदीप यादव, रवी बिश्नोई, मुकेश कुमार, आवेश खान, मोहम्मद सिराज, वॉशिंग्टन सुंदर.
भारत आणि दक्षिण आफ्रिका (South Africa vs India ODI series) यांच्यातील पहिल्या एकदिवसीय सामन्यात दक्षिण आफ्रिकेने ९ धावांनी विजय मिळवला होता. २५० धावांचे आव्हान पेलताना टॉपचे फलंदाज एकामागून एक बाद झाले. ४ बाद ५१ अशा परिस्थितीतून संजू सॅमसनने श्रेयस अय्यर (५०) आणि शार्दुल ठाकूर (३३) यांच्या मदतीने विजय खेचून आणण्याचा प्रयत्न केला होता, पण शार्दुल बाद होताच लक्ष्य अवघड होत गेले. तबरेज शम्सीच्या शेवटच्या षटकांत विजयासाठी ३० धावा करण्याचे संजूपुढे आव्हान होते, संजूने प्रयत्नाची पराकाष्ठा केली, परंतु त्याला २० धावांच करता आल्या. तो ८६ (६३ चेंडू) धावांवर नाबाद राहिला. भारताने सामना गमावला असला तरी लढवय्या संजू मात्र चाहत्यांचे मन जिंकून गेला.
हे ही वाचा :