रशियाकडून तेल खरेदीवरुन अमेरिका दबाव टाकतोय का?, भारताने स्पष्ट केली भूमिका | पुढारी

रशियाकडून तेल खरेदीवरुन अमेरिका दबाव टाकतोय का?, भारताने स्पष्ट केली भूमिका

वॉशिंग्टन : रशियाकडून तेलाची खरेदी करू नका, असे कोणीही भारताला सांगितले नाही, असे केंद्रीय पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्री हरदीपसिंग पुरी यांनी वॉशिंग्टनमध्ये बोलताना स्पष्ट केले आहे. देशातील नागरिकांना ऊर्जा पुरवण्याचे आमचे नैतिक कर्तव्य आहे. त्यासाठी भारत सरकार रशियातून तेल खरेदी करत राहील आणि कोणत्याही देशाने भारताला रशियातून तेल खरेदी बंद करण्यास सांगितले नाही, असे त्यांनी म्हटले आहे.

पुरी यांनी वॉशिंग्टनमध्ये ज्या बायडेन यांच्या प्रशासनातील अधिकारी, मंत्री यांच्या भेटी घेतल्या. यादरम्यान पुरी यांनी वॉशिंग्टन डीसी येथे भारतीय पत्रकारांच्या एका गटाशी संवाद साधताना सांगितले की, “भारताला जेथून तेल विकत घ्यावे लागेल तेथून ते विकत घेतले जाईल. या साध्या कारणाची चर्चा भारतातील लोकांपर्यंत नेणे योग्य नाही.”

रशिया-युक्रेन युद्धाचा जागतिक ऊर्जा प्रणालीवर दूरगामी परिणाम झाला आहे. पुरवठा आणि मागणीच्या पद्धतींमध्ये अडथळा आला आहे आणि दीर्घकालीन व्यापार थांबला आहे. यामुळे जगभरातील ऊर्जेच्या किमती वाढल्या आहेत. ज्यामुळे अनेक देशांतील उद्योगांना आणि संपूर्ण अर्थव्यवस्थेला धक्का बसला आहे. याबाबतच्या प्रश्नाला उत्तर देताना पुरी म्हणाले की, भारताने रशियाकडून तेल खरेदी थांबवावी असे कोणीही सांगितलेले नाही.

“जर तुमचे धोरण स्पष्ट असेल, म्हणजेच तुमचा ऊर्जा सुरक्षेवर विश्वास आहे. तुम्हाला ज्या स्रोतांकडून तेल खरेदी करायची असेल तिथून तुम्ही खरेदी कराल,” असे पुरी यांनी अमेरिकेच्या ऊर्जा मंत्री जेनिफर ग्रॅनहोम यांच्याशी झालेल्या द्विपक्षीय बैठकीनंतर सांगितले.
रशियाने युक्रेनवर केलेल्या हल्ल्यानंतर पाश्चिमात्य देश हळूहळू रशियाकडून ऊर्जा खरेदी कमी करत आहेत. पण एप्रिलपासून रशियातून भारतात होणाऱ्या कच्च्या तेलाच्या आयातीत ५० पटीने वाढ झाली आहे. सध्या ही आयात परदेशातून खरेदी केलेल्या क्रूडच्या १० टक्के एवढी आहे. रशिया- युक्रेन युद्धापूर्वी भारताने आयात केलेल्या एकूण तेलांपैकी फक्त ०.२ टक्के तेल रशियातील होते.

हे ही वाचा :

Back to top button