विजय मल्ल्याविरोधात दिल्ली पोलिसांत गुन्हा दाखल

नवी दिल्ली; पुढारी वृत्तसेवा : चेक बाऊन्स झाल्यासंदर्भातील खटल्याच्या सुनावणीस हजर राहिला नसल्याने विदेशात पळून गेलेला उद्योगपती विजय मल्ल्या याच्याविरोधात दिल्ली पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. राऊज अव्हेन्यू न्यायालयाच्या निर्देशावरुन पोलिसांनी हा गुन्हा दाखल केला आहे.
बँकांची कोट्यवधी रुपयांची फसवणूक करून विजय मल्ल्या काही वर्षांपूर्वी विदेशात पसार झालेला आहे. त्याच्याविरोधात देशात असंख्य गुन्हे दाखल आहेत. यातीलच चेक बाऊन्स प्रकरणाच्या खटल्याच्या सुनावणीस हजर राहण्याचे निर्देश न्यायालयाने दिले होते. मात्र सुनावणीस मल्ल्या हजर नसल्याने न्यायालयाने पोलिसांना गुन्हा दाखल करण्याचे निर्देश दिले. त्यानुसार दिल्ली इंटरनॅशनल एअरपोर्ट कंपनीच्या तक्रारीवरून पोलिसांनी कॅनॉट प्लेस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. किंगफिशर एअरलाईन्स कंपनी दिवाळखोरीत निघाल्यानंतर मार्च २०१६ मध्ये विजय मल्ल्या याने विदेशात पळ काढला होता. सध्या तो ब्रिटनमध्ये आहे. ब्रिटनमध्ये एप्रिल २०१७ मध्ये जामीन मिळाल्यापासून तो बाहेर आहे. विशेष म्हणजे गेल्या जुलै महिन्यात सर्वोच्च न्यायालयाने अवमान प्रकरणात मल्ल्या याला चार महिन्यांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावली होती.
हेही वाचा :
- Dasara 2022 : ही वेळ आहे अनेक नव्या संकल्पांसह सीमोल्लंघनाची; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिल्या दसऱ्याच्या शुभेच्छा
- अंधेरी विधानसभा पोटनिवडणुकीत काँग्रेसचा शिवसेनेला पाठिंबा
- लग्नानंतर पत्नीने कामावर जाणे म्हणजे कौर्य नव्हे : मुंबई उच्च न्यायालयाने पतीची घटस्फोटाची मागणी फेटाळली