Shopian Encounters | जम्मू- काश्मीरच्या शोपियानमधील चकमकीत ४ दहशतवाद्यांचा खात्मा | पुढारी

Shopian Encounters | जम्मू- काश्मीरच्या शोपियानमधील चकमकीत ४ दहशतवाद्यांचा खात्मा

शोपियान (जम्मू आणि काश्मीर) : जम्मू- काश्मीरमधील शोपियानमध्ये झालेल्या दोन वेगवेगळ्या चकमकीत (Shopian Encounters) सुरक्षा दलांनी ४ स्थानिक दहशतवाद्यांचा खात्मा केला. पहिली चकमक द्राच भागात झाली. या ठिकाणी तिघा दहशतवाद्यांना मारण्यात आले. हे तिघेजण स्थानिक असून ते दहशतवादी संघटना जैश-ए-मोहम्मद (JeM) शी संबंधित असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. काल संध्याकाळी सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक उडाली होती. दरम्यान, शोपियानच्या मूलू भागात आज बुधवारी सकाळी आणखी एक चकमक झाली. त्यात लष्कर-ए-तैयबा (LeT) च्या एका दहशतवाद्याला मारण्यात आले.

“जैश-ए-मोहम्मदशी संबंध असलेले तीन स्थानिक शोपियनच्या द्राच भागातील चकमकीत ठार झाले. मूलू येथे दुसरी चकमक सुरू आहे,” अशी माहिती काश्मीर झोन पोलिसांनी ट्विट करत दिली आहे. हनान बिन याकूब आणि जमशेद अशी दोन ठार झालेल्या दहशतवाद्यांची नावे आहेत. त्यांचा पुलवामा येथे नुकत्यात झालेल्या विशेष पोलीस अधिकारी जावेद दार यांच्या हत्येमध्ये सहभाग होता.

“हनान बिन याकूब आणि जमशेद या दहशतवाद्यांचा २ ऑक्टोबर रोजी पुलवामा येथील पिंगलाना येथे SPO जावेद दार आणि २४ सप्टेंबर रोजी पुलवामा येथे झालेल्या एका मजुराच्या हत्येत सहभाग होता,” असे पोलिसांनी सांगितले आहे. २ ऑक्टोबर रोजी प्रतिबंधित दहशतवादी संघटना लष्कर-ए-तैयबा (LeT) च्या स्थानिक दहशतवाद्याला जम्मू-काश्मीरमधील शोपियानच्या बसकूचन भागात पोलिसांनी सुरक्षा दलांसोबत केलेल्या संयुक्त कारवाईत ठार केले होते. काश्मीरच्या अतिरिक्त पोलीस महासंचालकांनी दिलेल्या माहितीनुसार, शोपियानच्या बसकूचन येथे ठार केलेल्या दहशतवाद्यांचे नाव नसीर अहमद भट असे आहे.

शोपियानच्या बसकूचन गावात दहशतवादी असल्याच्या माहितीच्या आधारे या भागात पोलीस, आर्मी (44R) आणि CRPF (178Bn) यांनी संयुक्त कारवाई करत घेराबंदी केला आणि शोधमोहीम सुरू केली होती. या शोध मोहिमेदरम्यान लपून बसलेल्या दहशतवाद्यांनी संयुक्त दलांवर अंदाधुंद गोळीबार केला. त्याला सुरक्षा दलांनी चोख प्रत्युत्तर दिले. पोलिसांनी चकमकीच्या ठिकाणाहून १ एके रायफलसह शस्त्रे आणि दारूगोळा जप्त केला आहे. (Shopian Encounters)

हे ही वाचा :

Back to top button