पीएफआयच्या चार संशयितांना दिल्लीत अटक | पुढारी

पीएफआयच्या चार संशयितांना दिल्लीत अटक

नवी दिल्ली, पुढारी वृत्तसेवा : प्रतिबंधित पीएफआय संघटनेच्या चार संशयितांना दिल्ली पोलिसांनी अटक केली आहे. पीएफआयच्या दहशतवादी कारवायांच्या अनुषंगाने शाहीन बाग पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर ही अटकेची कारवाई करण्यात आली आहे. पीएफआयवर बंदी घालण्यापूर्वीही दिल्लीत अनेक ठिकाणी तपास संस्थांनी छापे टाकून संशयितांना अटक करण्यात आली होती.

देशाच्या विविध भागात दहशतवाद पसरवीत असलेल्या तसेच देशविरोधी कारवायांत गुंतलेल्या पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडियावर २८ सप्टेंबरला केंद्र सरकारने बंदी घातली होती. तेव्हापासून पीएफआयवर कारवाईचा बडगा उगारण्यात आलेला आहे. दिल्लीमध्ये पीएफआय विरोधात गैरकृत्ये प्रतिबंधक कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे तर तीन कार्यालये सील करण्यात आली आहेत. शाहीन बाग पोलिस ठाण्यात दाखल करण्यात आलेल्या गुन्ह्यानुसार चार संशयितांना अटक केली आहे.

पीएफआयच्या इशाऱ्यावरुन काम करणाऱ्या ३२ लोकांना याआधी दिल्लीत अटक करण्यात आली होती. केंद्र सरकारने पीएफआय व तिच्याशी संलग्न असलेल्या रिहॅब इंडिया फाऊंडेशन, ऑल इंडिया इमाम कौन्सिल, नॅशनल कॉन्फडरेशन ऑफ ह्युमन राईट्स, ऑर्गनायझेशन या संघटनांवरही बंदी घातली आहे. समाजसेवा करण्याच्या नावाखाली या संघटना दहशतवाद पसरवित असल्याचा तपास संस्थांचा आरोप आहे.

हेही वाचा :

Back to top button