कौतुकास्पद! मंदिर रांगेत ‘खाकी’तील माणुसकीचे दर्शन | पुढारी

कौतुकास्पद! मंदिर रांगेत ‘खाकी’तील माणुसकीचे दर्शन

पुणे; पुढारी वृत्तसेवा: चतु:शृंगी देवीच्या दर्शनासाठी लागलेली मोठी रांग. सातव्या माळेजवळ काठी घेऊन एक खाकी वर्दीधारी शिरला आणि खांद्यावर छोटेसे बाळ घेऊन देवीच्या दर्शनाला आलेल्याला बाहेर काढले. कावराबावरा झालेल्या त्या चिमुकल्याचा बाप काही बोलण्याअगोदर त्याच्या हाताशी धरले आणि ‘तू रांगेऐवजी इकडून जा, छोट्याशा बाळाला घेऊन किती वेळ थांबणार; तुझ्यासाठी नाही तर या चिमुकल्यासाठी सोडतो,’ असे म्हणत थेट देवीच्या मूर्तीसमोर नेले. तीन तासांच्या पाहणीत अशा चिमुकल्या मुलांना घेऊन आलेल्या अनेकांना देवीचे दर्शन घडविणार्‍या ‘खाकी’ वर्दीधारीने माणुसकीचे दर्शन घडविले.

पुण्यातील आदिशक्ती म्हणून ओळख असलेल्या चतु:शृंगीदेवीच्या दर्शनासाठी येणार्‍या भाविकांसाठी पोलिसांनी एसआरपी जवानांच्या तुकड्या तैनात केल्या. शेवटचे चार दिवस होणारी गर्दी पाहता पोलिसांनी एसआरपी तुकडीसह अतिरिक्त पोलिस बंदोबस्त तैनात केला आहे. याचाच आढावा घेण्यासाठी ‘पुढारी टीम’ने मध्यरात्री 1 वाजेच्या सुमारास लाइनमध्ये उभे राहून पोलिसांचा अनुभव घेण्याचा प्रयत्न केला. दिवसा गर्दीमुळे दर्शन होणार नाही म्हणून बहुतांश पुणेकर रात्री 12 वाजेनंतर चतु:शृंगीदेवीच्या दर्शनासाठी येतात.

गर्दी पाहता पोलिसांनी अनेक ठिकाणी फिक्स पॉइंट लावले. त्याचबरोबर काही जवान फिरतीवरही ठेवले. त्यातीलच एक हवालदार विकी भिसे हा काठी घेऊन फिरता फिरता अनेक महिला व पुरुषांना बाहेर काढताना दिसला. आम्हीही त्याच्या हरकती टिपत बघ्याची भूमिका घेतली. रांगेतून बाहेर पडल्यावर तो हवालदार समजूत काढून त्यांना बाहेर पडण्याच्या मार्गावरून थेट मंदिरात नेत असल्याचे दिसले. लहान मुलांना कडेवर व खांद्यावर घेऊन रांगेत उभे राहण्याऐवजी थेट सोडत असल्याचे समजल्यावर आम्ही त्याच्याशी बोलून कौतुक केले. दिवसभरात शेकडो अशा भाविकांना थेट सोडून त्यांची सोय करून देतो, असे सांगत खाकीतील माणुसकी जिवंत असल्याचे दाखवून दिले.

Back to top button