Punjabi singer Alfaaz | सिद्ध मूसेवाला नंतर आणखी एका पंजाबी गायकावर हल्ला, गाडीखाली चिरडले | पुढारी

Punjabi singer Alfaaz | सिद्ध मूसेवाला नंतर आणखी एका पंजाबी गायकावर हल्ला, गाडीखाली चिरडले

मोहाली : पंजाबी गायक सिद्धू मूसेवाला याच्या हत्येने पंजाबी संगीत क्षेत्राला मोठा धक्का बसला होता. आता आणखी एका पंजाबी गायकावर जीवघेणा हल्ला करण्यात आला आहे. अल्फाज (Punjabi singer Alfaaz) असे या गायकाचे नाव आहे. गंभीर बाब म्हणजे त्याला चिरडण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. बानूर लांद्रन महामार्गावर एका ढाब्याच्या बाहेर रस्त्याच्या कडेला उभा असताना वेगवान वाहनाने अल्फाजला धडक दिली. यामुळे अल्फाज जखमी झाला. या प्रकरणी हरियाणातील पंचकुला येथील रायपूर राणी येथील संशयित विक्की याला मोहाली पोलिसांनी अटक केली आहे. पंजाबी गायक अल्फाज याला जखमी अवस्थेत पंजाबमधील मोहाली येथील एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

पंजाबी गायक यो यो हनी सिंगने (Yo Yo Honey Singh) अल्फाजच्या प्रकृतीविषयी इन्स्टाग्रामवर पोस्ट शेअर केली आहे. हनीने म्हटले आहे की ‘अल्फाज रुग्णालयात आयसीयूमध्ये असून त्याची प्रकृती चिंताजनक आहे. त्याच्यासाठी प्रार्थन करा.’

अधिक मिळालेल्या माहितीनुसार, अल्फाज आणि त्याचे काही मित्र रात्री जेवणासाठी मोहाली लँडरन रस्त्यावरील एका ढाब्यावर गेले होते. ते जेवण जेवल्यानंतर तिथे ढाब्याचा मालक आणि एक ग्राहकामध्ये पैशावरुन वाद सुरु होता. त्यानंतर तो ग्राहक गाडी घेऊन जात असताना अल्फाजची गाडी त्याच्या समोर आली. रागात असलेल्या ग्राहकाने आणि त्याच्या मित्रांनी गायक अल्फाजवर हल्ला केला. यात तो जखमी झाला. त्यानंतर अल्फाजला मोहाली येथील रुग्णालयात नेण्यात आले. या प्रकरणी संशयिताविरुद्ध गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

अल्फाज (Punjabi singer Alfaaz) यांच्या टीमकडून अधिकृत माहिती देण्यात आली आहे. त्यात म्हटले आहे की मोहाली पोलिसांनी रायपूर राणी येथील विक्की याच्याविरोधात गुन्हा नोंद केला आहे. विक्कीवर अमनजोत सिंह पवार उर्फ अल्फाज याला टेम्पोने धडक देऊन जखमी केल्याचा आरोप आहे.

मोहाली पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गायक अल्फाज आपल्या मित्रांसोबत ढाब्यावर गेला होता. यादरम्यान एक वाहन त्यांच्या अंगावर घालण्यात आले. वाहनाच्या धडकेने अल्फाज खाली कोसळला आणि त्याच्या पायावरुन गाडी गेली.

पंजाबी गायक सिद्धू मूसेवाला याची पंजाबच्या मानसा जिल्ह्यात २९ मे रोजी अज्ञात हल्लेखोरांनी गोळ्या झाडून हत्या केली होती. मूसेवाला हत्येमागे लॉरेन्स बिश्नोई हा मास्टरमाईंड आहे. बिश्नोई सध्या तिहार तुरुंगात आहेत. तर कॅनडा येथील गुंड गोल्डी ब्रार हा बिश्नोईचा जवळचा सहकारी आहे. या प्रकरणात तो इतर गुंडांसह एनआयएच्या रडारवर आहे.

हे ही वाचा :

Back to top button