दिल्लीच्या उपराज्यपालांची बदनामी करणारे सोशल मीडीया संदेश ‘आप‘ नेत्यांना हटवावे लागणार | पुढारी

दिल्लीच्या उपराज्यपालांची बदनामी करणारे सोशल मीडीया संदेश ‘आप‘ नेत्यांना हटवावे लागणार

नवी दिल्ली : पुढारी वृत्तसेवा – दिल्लीचे उपराज्यपाल व्ही. के. सक्सेना यांची बदनामी करणारे सोशल मीडीया संदेश हटवावेत, असे आदेश दिल्ली उच्च न्यायालयाने आज ( दि. २७ ) आम आदमी पक्षाच्या नेत्यांना दिले. संजय सिंग, आतिशी, सौरभ भारद्वाज, दुर्गेश पाठक, जस्मीन शाह आदी नेत्यांनी सोशल मीडीयावर आपली बदनामी केल्याचे सांगत उपराज्यपालांनी अब्रूनुकसानीचा दावा दाखल केला होता. त्यावर सुनावणी करताना उच्च न्यायालयाने वरील आदेश दिले.

उपराज्यपाल सक्सेना यांच्याविरोधात सोशल मीडीयावर टाकण्यात आलेले सर्व खोटे, अपमानकारक संदेश आणि व्हिडिओ हटविले जावेत, असे न्यायालयाने आदेशात म्हटले आहे. खादी आणि ग्रामोद्योग आयोगाच्या अध्यक्षपदावर असताना व्ही. के. सक्सेना आणि त्यांच्या कुटुंबियांनी 1400 कोटी रुपयांचा घोटाळा केला असल्याचा आरोप आम आदमी पक्षाच्या नेत्यांनी केला होता. यासाठी खादी आणि ग्रामोद्योग आयोगाच्या दोन माजी कर्मचाऱ्यांचा हवाला आप नेत्यांनी दिला होता.

सक्सेना यांनी दाखल केलेल्या याचिकेवरील निकाल गेल्या आठवड्यात न्यायालयाने राखून ठेवला होता. सक्सेना यांनी आप नेत्यांकडून दोन कोटी रुपयांच्या भरपाईची मागणीही याचिकेत केली होती. सक्सेना यांच्या वतीने ज्येष्ठ वकील महेश जेठमलानी आणि मणिंदर सिंग यांनी बाजू मांडली.

हेही वाचा : 

 

Back to top button