

पुढारी ऑनलाईन डेस्क : नॅशनल स्टॉक एक्सचेंज (NSE) फोन टँपिंगप्रकरणी मुंबईचे माजी पोलीस आयुक्त संजय पांडे यांना दिल्ली कोर्टाने चार दिवसांची सीबीआय कोठडी सुनावली आहे. यापूर्वी त्यांना त्यांना सक्तवसुली संचालनालयाने (ED) अटक केली होती. या प्रकरणाची सखोल चौकशी करण्यासाठी सीबीआय कोठडी सुनावल्याचे न्यायालयाने स्पष्ट केले आहे. (Sanjay Pandey CBI Arrest )
'ईडी'ने १४ जुलै रोजी एनएसईचे माजी सीईओ रवी नारायण, माजी एनएसई प्रमुख चित्रा रामकृष्ण आणि मुंबईचे पोलीस आयुक्त संजय पांडे यांच्याविरुद्ध 'पीएमएल' अंतर्गत गुन्हा दाखल केला होता. सीबीआयने याआधीच या तिघांविरुद्ध गुन्हा दाखल केला होता. रवी नारायण हे 'ईडी'च्या अटकेत आहेत. एनएसई घोटाळ्याशी संबंधित मनी लाँड्रिंग प्रकरण आणि एक्सचेंज कर्मचार्यांचे फोन बेकायदेशीर टॅपिंगप्रकरणी ही कारवाई करण्यात आली होती. (NSE Phone Tapping Case)
२००९ ते २०१७ या कालावधीत राष्ट्रीय शेअर बाजारातील तीन संवेदनशील विभागांतील कर्मचाऱ्यांचे फोन टॅपिंग झाल्याचे प्रकरण समोर आले होते. हे टॅपिंग पांडे यांच्या आयसेक कंपनीने केले असून याकरिता साडेचार कोटी रुपये मिळाल्याचा ठपका त्यांच्यावर ठेवण्यात आला आहे. एनएसईच्या प्रकरणातील झालेल्या या घोटाळ्यासंदर्भात ईडीने पांडे यांचा मनी लाँड्रिंग कायद्यातील फौजदारी कलमांतर्गत जबाब नोंदवत अटक केली होती. तसेच राष्ट्रीय शेअर बाजारात को-लोकेशन घोटाळा झाला त्यावेळी तेथील सायबर सिक्युरिटी ऑडिटचे काम पांडे यांच्या आयसेक कंपनीला मिळाले होते असे तपासामध्ये सांगण्यात आले आहे.
को-लोकेशनअंतर्गत ब्रोकर्सद्वारे एक सर्व्हर एक्सचेंज परिसरात सेट केला जातो. या को-लोकेशनच्या मदतीने ते शेअर बाजारातील हालचाली लवकर समजू शकतात. याच पद्धतीचा फायदा घेऊन अनेक एजंट्सनी बेकायदेशीरपणे कोट्यावधी रुपयांची उलाढाल केल्याचे तपासात उघड झाले आहे. अल्गोरिदममध्ये छेडछाड झाल्याचे देखील या तपासात निष्पन्न झाले आहे.
हेही वाचा