एमआयडीसीच्या विस्तारासाठी संरक्षण देऊ : आमदार नीलेश लंके | पुढारी

एमआयडीसीच्या विस्तारासाठी संरक्षण देऊ : आमदार नीलेश लंके

पारनेर : पुढारी वृत्तसेवा :  नव्याने सुरू झालेल्या एमआयडीसीमध्ये उद्योजकांनी गुंतवणूक करावी. स्थानिक पातळीवर त्यांना संरक्षण देण्याची आपली जबाबदारी आहे. असा विश्वास आमदार नीलेश लंके यांनी दिल्याने म्हसणे फाटा येथील एमआयडीसीमध्ये जपानी उद्योजकांनी येण्यास सुरुवात केली आहे. काही कंपन्यांचे उत्पादन देखील या ठिकाणी सुरू झाले आहे. या उद्योजकांना सुरक्षितता मिळावी, म्हणून आमदार नीलेश लंके हे नेहमी प्रयत्नशील असतात. त्या धर्तीवरच त्यांनी येथील कंपनी अधिकार्‍यांशी बैठक घेत संवाद साधला. सुपा एमआयडीसी तील सर्व उच्चपदस्थ अधिकार्‍यांसोबत या वर्षातील तिसरी बैठक युनो मिंडा येथे झाली.

सुपे येथील म्हसणे फाटा येथे नव्याने विस्तारित झालेल्या जपानी हबचा विस्तार झाला असून, 946 हेक्टर जमिनीचे अधिग्रहण होणार आहे. त्यातील 564 हेक्टर क्षेत्राचे अधिग्रहण करण्यात आले आहे. त्यापैकी अनेक ठिकाणी उद्योजकांनी गुंतवणूक केली आहे, तर काही ठिकाणी कंपन्यांचे उत्पादने सुरू झाली आहेत. स्थानिक तरुणांना येथे रोजगाराची मोठी संधी उपलब्ध होणार आहे. या परिसरात सर्व कंपन्यांसाठी सुविधा उपलब्ध व्हाव्यात, कंपनीतील अधिकारी-कर्मचार्‍यांना कोणत्याही अडचणी भासू नयेत, स्थानिकांकडून त्यांना कोणताही त्रास होऊ नये, यासाठी या बैठकीमध्ये चर्चा झाली.

परिसरात अग्निशामक केंद्र, पोलिस ठाणे, गॅस पाईपलाईन, इंटरनेट, बसस्थानक, टाऊन प्लांनिंग महिलांना अपंगांना येथे रोजगारात प्राधान्य व त्यांची सुरक्षितता सीएसआर फंड या सर्व विषयांवर अधिकार्‍यांंच्याशी आमदार लंके यांची सविस्तर चर्चा केली. त्यातून कंपन्यांसाठी जास्तीत जास्त मदत करण्याचे आश्वासित आमदार लंके यांनी केले. युनो मिंडा, बीएमसीसी, मायडिया, मिस्टोभोशी, सीएमएल, एक्साइड, केएसपीजी, एपिटोम, जाफा, आर्मस्टुडं, पीजी ग्रुप, वरून बेव्हरेजेस, इंडिको फूडस, अथर्व बीओ फार्मा आदी कंपन्यांचे अधिकारी तसेच आमदार नीलेश लंके प्रतिष्ठानचे सचिव कारभारी पोटघन, इंजिनिअर सतीश भालेकर, शशी कारखिले बैठकीला उपस्थित होते.

सुपा येथे नवीन एमआयडीसीमध्ये उद्योजकांनी गुंतवणूक केल्यास येथे मोठा रोजगार स्थानिक तरुणांना उपलब्ध होणार आहे. त्यासाठी या कंपन्यांच्या अधिकार्‍यांशी संवाद साधला. तसेच सर्व कंपन्यांच्या अधिकार्‍यांशी चर्चा करून एमआयडीसी वाढविण्याच्या दृष्टीने आणि त्यांना संरक्षण देण्याची सर्व जबादारी घेतली आहे.
                                                    -आमदार नीलेश लंके, पारनेर-नगर मतदारसंघ

Back to top button