पंतप्रधानांच्या ८६ भाषणांचे संकलन, ‘सबका साथ, सबका विकास, सबका विश्वास’ पुस्तकाचे प्रकाशन | पुढारी

पंतप्रधानांच्या ८६ भाषणांचे संकलन, 'सबका साथ, सबका विकास, सबका विश्वास' पुस्तकाचे प्रकाशन

नवी दिल्ली; पुढारी वृत्तसेवा : देशाचे माजी उपराष्ट्रपती एम. व्यंकय्या नायडू यांच्या हस्ते पंतप्रधानांच्या निवडक भाषणांचा संग्रह ‘सबका साथ, सबका विकास, सबका विश्वास’ या पुस्तकाचे नुकतेच प्रकाशन करण्यात आले. माहिती आणि प्रसारण मंत्रालयाअंतर्गत प्रकाशन विभागाच्या संचालनालयातर्फे आयोजित या कार्यक्रमात केरळचे राज्यपाल आरिफ मोहम्मद खान आणि केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री अनुराग ठाकूर प्रामुख्याने उपस्थित होते. या पुस्तकात पंतप्रधानांचे मे २०१९ ते मे २०२० या काळातील विविध विषयांवरील जवळपास ८६ भाषणांचे संकलन करण्यात आले आहेत.

देशासमोरील आव्हाने आणि त्यावर मात करण्यासाठी केले जात असलेले समन्वित प्रयत्न याविषयीचे आकलन व्यापक करण्याच्या दृष्टीने या पुस्तकाचे महत्वपूर्ण योगदान आहे, असे प्रतिपादन माजी उपराष्ट्रपतींनी व्यक्त केले. विद्यमान सरकार ‘सर्वे जन सुखिनो भवन्तु’ हे व्यापक तत्वज्ञान अंगीकारून काम करीत असल्याचे ते म्हणाले. उत्कृष्ट संभाषण कौशल्याच्या देणगीसह पंतप्रधान मोदी देशातील सर्व लोकांशी सारख्याच प्रकारे संपर्क साधू शकतात, अशा शब्दांत एम. व्यंकय्या नायडू यांनी पंतप्रधानांची स्तुती केली.

केंद्राच्या विविध योजनेतील लाभार्थ्यांना थेट लाभ हस्तांतरणामुळे लोक दलालांच्या कचाट्यातून मुक्त झाले आणि कल्याणकारी उपायांचे वितरण शेवटच्या स्तरापर्यंत सुनिश्चित झाल्याचे नायडू म्हणाले. पूर्वीच्या योजना सरकारी किंवा राजकीय म्हणून ओळखल्या जात होत्या. मात्र, उद्दिष्टांची पूर्तता लोकसहभागावर मोठ्या प्रमाणात अवलंबून असते, हे पंतप्रधान मोदी यांनी जाणले. यातूनच स्वच्छ भारत मोहीम पंतप्रधानांनी जनआंदोलन म्हणून उभी केली, असे नायडू म्हणाले.

पंतप्रधानांच्या भाषणांमधून, गुंतागुंतीच्या राष्ट्रीय मुद्दयावर त्यांचे विचार आणि त्यांचे नेतृत्व, ज्याची परिणती भारत जगातील पाचव्या क्रमांकाची अर्थव्यवस्था होण्यात झाली आहे, ते समजून घेता येवू शकते, असे केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांनी स्पष्ट केले. त्यांच्या तळमळीसोबतच दलालांना वगळत शेवटच्या स्तरापर्यंत सेवा देण्याची आणि सुनिश्चित करण्याची त्यांची तळमळ आणि त्यासोबत कृती यामुळेच लोकांना त्यांच्याविषयी अतूट विश्वास वाटतो, असे प्रतिपादन ठाकूर यांनी केले.

हेही वाचलंत का ?

 

 

Back to top button