पुढारी ऑनलाईन – जर वाहन वितरकाने जुनी आणि नादुरुस्त स्थितीतील कार दिली असेल तर भरपाई म्हणून ग्राहकाला नवी कार द्यावी लागणार, असा निकाल सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे. या संदर्भात जिल्हा ग्राहक मंचाने यापूर्वी दिलेला निकाल सर्वोच्च न्यायालयाने ग्राह्य धरला आहे. (Non-delivery of new car is unfair trade practice)
एम. आर. शहा आणि कृष्णा मुरारी या दोन न्यायमूर्तींच्या पीठापुढे हा खटला सुनावणीसाठी होता. जर वितरकाने नवी कार दिली नसेल तर व्यावसायिक नीतिमत्तेच्या विरोधात आहे, असेही न्यायालयाने म्हटले आहे. "जर नवी कार बुक केली असेल आणि त्याचे पैसे दिले असतील, तर नवीन वाहन देण्याची जबाबदारी वाहन वितरकाची आहे. तसे झाले नसेल तर तो अप्रामाणिकपणा म्हणावा लागेल," असे न्यायमूर्तींनी म्हटलं आहे.
या प्रकरणात राजीव शुक्ला या ग्राहकाने जिल्हा ग्राहक मंचाकडे तक्रार केली होती. या ग्राहकाने गोल्ड रश सेल्स अँड सर्व्हिस लिमिटेड या डिलरकडे २००५ला कार बुक केली होती, पण त्याला २००६ला ही कार मिळाली. तोपर्यंत या कारचे नवीन मॉडेल बाजारात आले होते. या ग्राहकाला मिळालेली कार ही वापरलेली आणि नादुरुस्त स्थितीतील होती. या प्रकरणात ग्राहक मंचाने तक्रारदाराच्या बाजूने निकाल देत नवी कार देण्याचे आदेश दिले. ग्राहकाला वितरकाने दिलेली कार ही टेस्ट ड्राईव्हसाठीची होती, असेही आदेशात नमूद करण्यात आले होते. हा निकाल राज्य ग्राहक तक्रार निवारण मंचानेही मान्य केला.
हा खटला नंतर राष्ट्रीय ग्राहक तक्रार निवारण मंचाकडे गेला. त्यामध्ये जुनी कार दिली असल्याचे सिद्ध झाले, पण नव्या कार ऐवजी१ लाख रुपये भरपाई देण्याचा निकाल देण्यात आला. या प्रकरणात तक्रारदार ग्राहकाच्या वतीने ॲड. प्रवीण अग्रवाल यांनी बाजू मांडली. तर बचाव पक्षाच्या वतीने ॲड. अभिनव रामकृष्णन यांनी बाजू मांडली.
हेही वाचा