‘कुतुब मीनार’वर मालकी हक्कासाठीचा अर्ज न्यायालयाने फेटाळला | पुढारी

'कुतुब मीनार'वर मालकी हक्कासाठीचा अर्ज न्यायालयाने फेटाळला

नवी दिल्ली; पुढारी वृत्तसेवा : राजधानी दिल्लीतील ऐतिहासिक कुतुब मीनारवर मालकी हक्काचा दावा करणाऱ्या एका हस्तक्षेप अर्जाला आज (दि.२०) साकेत न्यायालयाने फेटाळले. आग्रा ते यमुना आणि गंगा नदी दरम्यान मेरठ, अलिगढ, बुलंदशहर तसेच गुडगाव क्षेत्रावरील अधिकाराची मागणी अर्जातून करण्यात आली होती. संबंधित अर्ज कुतुब मीनार परिसरातील हिंदू मंदिरांच्या जीर्णोद्धाराची मागणी करणाऱ्या याचिकांसंबंधी दाखल करण्यात आला होता. दरम्यान कुतुब मीनार परिसरात हिंदू आणि जैन धार्मियांना पूजेचा अधिकार देण्याची विनंती करणाऱ्या याचिकांवर न्यायालय १९ ऑक्टोबरला सुनावणी घेणार आहे.

अर्जदार महेंद्र सिंह यांनी विशेष स्वरूपात कुठल्याही अधिकाराचा दावा केलेला नसल्याने तसेच संबंधित प्रकारणात त्यांना पक्षकार होण्याचा कुठलाही अधिकार नसल्याने अर्ज फेटाळला जावा, अशी बाजू १३ सप्टेंबरला झालेल्या सुनावणी दरम्यान भारतीय पुरातत्व विभागाने मांडली होती. सिंह यांनी बऱ्याच मोठ्या आणि विस्तृत क्षेत्रावर अधिकाराचा दावा केला असल्याचे देखील एएसआयने न्यायालयाच्या निदर्शनात आणून दिले होते.

गत वर्षी दिल्ली उच्च न्यायालयात सुलताना बेगम यांच्यावतीने दाखल अशाप्रकारची याचिका फेटाळली होती, असे देखील एएसआयने न्यायालयात सांगितले होते. या याचिकेतून याचिकाकर्तीने लाल किल्ल्यावर हक्क सांगितला होता. शेवटचे मुघल सम्राट बहादूर शहा जाफर यांचे दुसरे पणतू यांची विधवा असल्याचा दावा सुलताना यांनी याचिकेतून केला होता.

हेही वाचलंत का ? 

Back to top button