बीड : फोटो शेअर करत केज पोलिसांची राजशेखर मोरे यांना आदरांजली | पुढारी

बीड : फोटो शेअर करत केज पोलिसांची राजशेखर मोरे यांना आदरांजली

केज; गौतम बचुटे : माजलगाव धरणात बुडालेल्या डॉ. दत्ता फपाळ यांचा मृतदेह शोधण्यासाठी जीवावर उदार होऊन धरणात उतरलेल्या केडीआरएफचे जवान राजशेखर मोरे यांचा दुर्दैवी बुडून मृत्यू झाला. या घटनेवर केज पोलीस ठाण्याचे कर्मचारी हळहळ व्यक्त करीत आहेत.

माजलगाव येथे शहीद झालेले केडीआरएफचे जवान आणि केज पोलिसांचे अत्यंत जिव्हाळ्याचे संबंध होते. सहा महिन्यांपूर्वी एका अत्यंत आव्हानात्मक खुनाच्या तपासात केज पोलिसांचे पथक कोल्हापूरला गेले होते. सहायक पोलीस अधीक्षक पंकज कुमावत आणि सहायक पोलीस निरीक्षक शंकर वाघमोडे यांच्या मार्गदर्शनाखाली लव्हूरी (ता. केज) येथील सुदाम उर्फ सुधाकर चाळक यांच्या खुनाच्या तपासासाठी पोलीस उपनिरीक्षक राजेश पाटील आणि पोलीस नाईक दिलीप गित्ते, अनिल मंदे, संतोष गित्ते यांचे पथक कोल्हापूरला गेले होते.

मारेकऱ्यांनी सुदाम उर्फ सुधाकर चाळक याचा खून करून मृतदेह कोल्हापूर जिल्ह्यातील नांगनूर (ता. गडहिंग्लज) येथील हिरण्यकेशी नदीत फेकून दिला होता. राजशेखर मोरे यांच्या टीमने तब्बल १८ ते २० तास अथक प्रयत्न तीन आठवडे पाण्याखाली सडलेला मृतदेह बाहेर काढला होता. त्यामुळे केज पोलिसांना खुनाचा उलगडा करता आला होता. हा तपास महाराष्ट्रात चर्चेचा ठरला होता. या तपासात महत्वाची भूमिका ही राजशेखर मोरे यांची होती. तेव्हापासून राजशेखर मोरे आणि केज पोलिसांचे एक अतूट आणि प्रेमाचे नाते निर्माण झाले होते. कोल्हापूर येथे गेलेल्या केज पोलिसांच्या टीमसोबत राजशेखर मोरे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी फोटो देखील काढले होते.

दरम्यान, माजलगाव येथे डॉ. फपाळ यांचा माजलगाव धरणातील पाण्यातील मृतदेहाचा शोध घेऊन तो पाण्याबाहेर काढणे स्थानिक पाणबुड्यांना शक्य नव्हते. म्हणून जिल्हाधिकारी राधा विनोद शर्मा यांनी कोल्हापूरच्या केडीआरएफ टीमला पाचारण केले होते. त्या साहसी टीममध्ये राजशेखर मोरे यांचा समावेश होता. बीड जिल्ह्यातील मोहिमेवर निघण्यापूर्वी राजशेखर मोरे यांनी पोलीस उपनिरीक्षक राजेश पाटील, दिलीप गित्ते, अनिल मंदे आणि संतोष गित्ते यांना फोन करून काम आटोपल्यास भेट घेण्याचे आश्वासन दिले होते. परंतु त्यांची भेट होणे नियतीला मान्य नसावे म्हणून या साहसी पाणबुड्याचा आणि सर्वांना हवाहवासा वाटणारा राजशेखर मोरे यांच्या दुर्दैवी मृत्यू झाला.

या मृत्यूमुळे केज पोलीस ठाण्याचे प्रभारी सहायक पोलीस निरीक्षक शंकर वाघमोडे, सहायक पोलीस निरीक्षक संतोष मिसळे, पोलीस नाईक अशोक नामदास, दिलीप गित्ते, अनिल मंदे, संतोष मिसळे हे भावुक झाले. त्यांनी शहीद जवान राजशेखर मोरे यांच्या सोबतचे फोटो शेअर करीत आदरांजली व्यक्त केली आहे.

हेही वाचलंत का ? 

Back to top button