काँग्रेस वर्किंग कमिटीच्या २३ पैकी १२ जागांसाठी निवडणूक जाहीर | पुढारी

काँग्रेस वर्किंग कमिटीच्या २३ पैकी १२ जागांसाठी निवडणूक जाहीर

नवी दिल्ली : पुढारी ऑनलाईन; काँग्रेसने अखेर काँग्रेस वर्किंग कमिटीचा निवडणूक कार्यक्रम जाहीर केला आहे. काँग्रेस वर्किंग कमिटीच्या २३ पैकी १२ जागांसाठी निवडणूक होणार आहे. तर उर्वरित ११ जागा नामांकनाने भरल्या जाणार आहेत. काँग्रेस पक्षाच्या मध्यवर्ती निवडणुकांचे प्रमुख मुधसुदन मिस्त्री यांनी ही माहिती दिली आहे. म्हणजेच या १२ जांगासाठी १२ पेक्षा जास्त अर्ज असतील, तर निवडणूक घ्यावी लागणार आहे. १९९७ ला काँग्रेस वर्किंग कमिटीची निवडणूक झाली होती. त्यानंतर निवडणुकीची पद्धत बंद होऊन अध्यक्षांना वर्किंग कमिटीचे पुर्नघटन करण्याचे अधिकार देण्याची प्रथा सुरू झाली.

काँग्रेस वर्किंग कमिटीची निवडणूक घेण्याची मागणी जी २३ गटातील असंतुष्ट नेत्यांनी याआधी केली होती. ही निवडणूक काँग्रेसमधील अंतर्गत वादाचा मुद्दा राहिला आहे. मिस्त्री यांनी सांगितले की “प्रदेश रिटर्निंग अधिकारी” लवकरच काँग्रेस वर्किंग कमिटी स्तरावरील प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी राज्यांमध्ये बैठका घेतील. ते कमिटीच्या प्रतिनिधींमध्ये एकी घडवण्याचा प्रयत्न करतील. जेणेकरुन नवीन प्रदेशाध्यक्षांची निवड करण्यासाठी आगामी अध्यक्षांना अधिकृत करण्यासाठी ठराव मंजूर केला जाईल.

काँग्रेस अध्यक्षाची निवडणूक नियोजित वेळेनुसार होईल आणि २४ ते ३० सप्टेंबर दरम्यान नामांकन दाखल केले जातील, असे मिस्त्री यांनी स्पष्ट केले. अध्यक्ष पदासाठी राहुल गांधी यांची निवड होणे अनिश्चित आहे. या पदासाठी राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत प्रबळ दावेदार मानले जात आहेत. गेहलोत यांनी स्वतः काँग्रेसमध्ये बदलाचे संकेत दिले आहेत. ते राज्यांचे दौरे करत आहेत. मी कुठेही गेलो तरी, राजस्थान माझ्या हृदयात राहील असे त्यांनी म्हटले आहे.

पण, पक्षाने उमेदवारांबाबत मौन बाळगले आहे. राहुल गांधी यांच्याबद्दल विचारले असता, काँग्रेस प्रवक्ते जयराम रमेश यांनी म्हटले आहे की, कोण उमेदवारी अर्ज भरणार आणि या निवडणुकीत राहुल असतील की नाही हे येत्या दहा दिवसांत कळेल.

हे ही वाचा :

Back to top button