मी काँग्रेस सोडण्याचा प्रश्नच नाही : आ. पृथ्वीराज चव्हाण | पुढारी

  मी काँग्रेस सोडण्याचा प्रश्नच नाही : आ. पृथ्वीराज चव्हाण

कराड; पुढारी वृत्तसेवा :  मी काँगे्रस विचारांचाच असून पक्ष सोडण्याचा प्रश्नच नाही, अशा शब्दात माजी मुख्यमंत्री आमदार पृथ्वीराज चव्हाण यांनी त्यांच्याबाबत सुरू असणार्‍या तर्कवितर्कांना पूर्णविराम दिला आहे. त्याचबरोबर वेदांता-फॉक्सकॉन या प्रकल्पासाठी तळेगावमधील जागा देण्याचे निश्चित केले होते. मात्र, त्यानंतरही महाराष्ट्रातून हा प्रकल्प चर्चेतही नसणार्‍या गुजरातला नेण्यात आला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून झालेल्या हस्तक्षेपामुळेच हे झाल्याचा दावा माजी मुख्यमंत्री आमदार पृथ्वीराज चव्हाण यांनी केला आहे.
माजी मुख्यमंत्री आमदार पृथ्वीराज चव्हाण यांनी गुरुवारी कराडमध्ये कराड तालुक्यातील प्रशासकीय अधिकार्‍यांच्या उपस्थितीत आढावा बैठक घेतली. त्यानंतर पत्रकारांशी संवाद साधताना आमदार चव्हाण यांनी ‘वेदांता – फॉक्सकॉन’प्रकरणी केंद्र सरकारसह राज्य शासनावर त्यांनी जोरदार टीका केली.

आमदार चव्हाण म्हणाले, राज्यात तांत्रिकद़ृष्ट्या डबल इंजिन सरकार कार्यरत आहे. या डबल इंजिन सरकारची राज्याला मोठी किंमत चुकवावी लागत आहे. 2019 पूर्वी तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यकाळापासून वेदांता – फॉक्सकॉन प्रकल्प महाराष्ट्रात व्हावा, यासाठी प्रयत्न सुरू होते. महाविकास आघाडी सरकारने तळेगाव येथील जमीन या प्रकल्पाला देण्याचे निश्चित केले होते. वीज, पाणी यासह कंपनीच्या अन्य मागण्यांवर विचार होऊन 38 हजार कोंटीची सवलतही देण्यात आली होती. महाराष्ट्रासोबत या प्रकल्पासाठी तेंलगणा, कर्नाटक ही दोन राज्ये प्रयत्नशील होती. गुजरातचे नाव कधीही चर्चेत नव्हते. मात्र अचानकपणे हा प्रकल्प आता गुजरातला होणार असल्याचे जाहीर करण्यात आले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून हस्तक्षेप केला गेल्यानेच हा प्रकल्प गुजरातला गेला असल्याचा दावाही आमदार चव्हाण यांनी यावेळी केला.

यापूर्वीही आंतरराष्ट्रीय वित्तीय सेवा केंद्र मुंबईतून अहमदाबादनजीक हलवण्यात आले आहे. त्यासाठीच बुलेट ट्रेनचा घाट घालण्यात आला आहे. याशिवाय पालघर येथील नियोजित मरीन पोलिस अ‍ॅकॅडमी द्वारका येथे हलवण्यात आली आहे. त्यामुळेच राज्याला आता तिसरा मोठा धक्का बसला आहे. अशाप्रकारे मोठा प्रकल्प हायजॅक करून स्वतःच्या राज्यात नेण्याचा प्रयत्न आजवर कोणत्याही पंतप्रधानांकडून झाला नव्हता. केवळ महाराष्ट्रासह मुंबईचे महत्त्व कमी करून अहमदाबादसह गुजरातचे महत्त्व वाढवण्याचा प्रयत्न केंद्र सरकारकडून सुरू असल्याचेही आमदार चव्हाण यांनी यावेळी सांगितले. तसेच केंद्र सरकारसह राज्य शासनाच्या कार्यपद्धतीवर आमदार पृथ्वीराज चव्हाण यांनी जोरदार टिकाही केली.

म्हणूनच रखडला मंत्रीमंडळ विस्तार…

पक्षांतरबंदी कायद्यातील तरतुदीप्रमाणे मुख्यमंत्र्यांसह 16 आमदारांचे निलंबन होईल, असे आपले मत आहे. याबाबतची सुनावणी 27 तारखेला होणार आहे. सध्यस्थितीत सत्ताधारी पक्षातील अनेक आमदार मंत्री होण्यासाठी कपडेही घालून तयार आहेत. मात्र सरकारच पडणार असल्याने 10 – 15 दिवसांसाठी मंत्री होऊन करायचे काय ? असा प्रश्न आहे. त्यामुळेच राज्य मंत्रीमंडळ विस्तार रखडला आहे, असा दावा आमदार पृथ्वीराज चव्हाण यांनी केला आहे. तसेच सध्या मंत्र्यांनाही आपल्याकडे किती व कोणती खाती आहेत? याची माहिती नाही. पालकमंत्री नसल्याने राज्याचे खूप मोठे नुकसान होत असल्याचेही सांगत आमदार पृथ्वीराज चव्हाण यांनी राज्य शासनावर घणाघाती टीका केली आह

काँग्रेस अध्यक्षपदाची निवडणूक लढवणार नाही

मी काँग्रेस सोडणार असल्याच्या बातम्या कुणी पेरल्या याची माहिती नाही. मी काँग्रेस विचारांचा असून काँग्रेसपासून बाजूला होण्याचा प्रश्नच नाही असे स्पष्ट करत आपल्याबाबत लढवल्या जाणार्‍या सर्व तर्कविर्तकांना आमदार चव्हाण यांनी पूर्णविराम दिला आहे. काँग्रेस अध्यक्ष पदाची निवडणूक लढवणार असल्याचेही चर्चा सुरू असल्याकडे लक्ष वेधले असता आपण ही निवडणूक लढवणार नाही, असे आमदार चव्हाण यांनी सांगितले. राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखालील भारत जोडो यात्रेत आपण सहभागी होणार असून 16 नोव्हेंबरला नांदेडमध्ये या यात्रेचे आगमन होणार आहे. त्यानंतर 19 दिवस ही यात्रा महाराष्ट्रात असणार असून त्याबाबतचे नियोजन करण्यात आले असल्याचेही आ. चव्हाण यांनी सांगितले.

भाजपकडून लोकशाही संपवण्याचा प्रयत्न…

महाराष्ट्रात भाजपने काय केले ? हे सर्वांनाच माहिती आहे. गोव्यातील 11 पैकी 8 आमदारांना फोडून भाजपने त्यांना काँग्रेसपासून दूर केले आहे. भाजप नेते छोटे – छोटे पक्ष संपवण्याबाबत नेहमीच भाष्य करत असतात. काँग्रेसमुक्त भारत करण्याचा दावाही केला जातो. लोकशाही संपवण्यासाठी प्रथम विरोधी पक्ष संपवणे आवश्यक असतात आणि भाजपकडून सध्यस्थितीत संपूर्ण देशभर हेच सुरू आहे. भाजपकडून लोकशाही धोक्यात आली आहे. लोकशाही वाचवण्याची ताकद केवळ काँग्रेसमध्येच आहे.

Back to top button