नवी दिल्ली : पुढारी ऑनलाईन : भारतात लवकरच उपग्रहाच्या माध्यमातून ब्रॉडबँड इंटरनेट (satellite internet) सेवा सुरू होणार आहे. यासाठी रिलायन्स जिओ इन्फोकॉमच्या उपग्रह विभागाला दूरसंचार विभागाकडून लेटर ऑफ इंटेट मिळाले आहे. या सेवेला ग्लोबल मोबाईल पर्सनल कम्युनिकेशन सॅटेलाईट (जीएमपीसीएस) असे म्हटले जाते. यापूर्वी भारती ग्रुपच्या वन वेब या कंपनीला या सेवेसाठी परवानगी मिळाली आहे.
टाटा ग्रुपची नेल्को, कॅनडातील टेलेसॅट, तसेच ॲमेझॉन या कंपन्या या तंत्रज्ञानावर आधारित इंटरनेट सेवा भारतात सुरू करणार आहेत. इलन मस्क यांची स्पेस एक्स कंपनी या तंत्रज्ञानात अग्रेसर मानली जाते. या तंत्रज्ञानामुळे अगदी दुर्गम भागात अतिवेगवान इंटरनेट सेवा पुरवता येते.
लेटर ऑफ इंटेन्ट मिळाल्यामुळे जिओ कंपनीला परवानगी असलेल्या भागात ही सेवा सुरू करू शकते. हे लायन्स २० वर्षांसाठी असेल. यासाठी जिओने एसईएस या कंपनीसी परस्पर सहकार्य करार केला आहे. भारती ग्रुपच्या वनवेबची ही सेवा ऑगस्ट २०२३मध्ये सुरू होण्याची शक्यता आहे. सध्या रशिया आणि युक्रेन युद्धामुळे या सेवेसाठी आवश्यक असणारे लो अर्थ ऑर्बिट सॅटेलाईटचे प्रक्षेपण भारती ग्रुप करू शकलेली नाही. त्यामुळे ही सेवा सुरू करण्यात विलंब होत आहे.
इलन मस्क यांची स्टारलिंक ही कंपनी अशी सेवा देते, पण त्यांनी भारतातील प्रकल्प गुंडाळला असल्याचे बोलले जाते. भारतात परवानगी घेतल्याशिवाय या सेवेसाठी बुकिंग सुरू करता येणार नाही, असा इशारा भारत सरकारने स्टारलिंकला दिला होता. ३१ जानेवारी २०२२पर्यंत स्टारलिंक हा परवाना मिळवणार होती. पण अजून तरी स्टारलिंकने असा परवाना मिळवलेला नाही. भारतात २०२३च्या मध्यावधीपर्यंत या सेवा सुरू होणे अपेक्षित आहे. उपग्रहांच्या माध्यमातून अशी सेवा देताना आवश्यकत्या स्पेक्ट्रमबद्दल स्पष्टता आल्यानंतर या सेवा सुरू होऊ शकणार आहे.
हेही वाचा