Infosys Moonlighting : ‘इन्फोसिस’चा कर्मचा-यांना दणका! ‘मूनलाइटिंग’मध्ये सापडल्यास गमवावी लागणार नोकरी

Infosys Moonlighting : ‘इन्फोसिस’चा कर्मचा-यांना दणका! ‘मूनलाइटिंग’मध्ये सापडल्यास गमवावी लागणार नोकरी

पुढारी ऑनलाईन डेस्क : Infosys Moonlighting issue : आयटी क्षेत्रातील दिग्गज कंपनी इन्फोसिसने (Infosys) आपल्या कर्मचाऱ्यांना 'मूनलाइटिंग'बाबत गंभीर इशारा दिला आहे. एचआरने सर्व कर्मचाऱ्यांना पाठवलेल्या ई-मेलमध्ये आचारसंहितेच्या दृष्टीने 'मूनलाइटिंग'ला परवानगी नसल्याचे म्हटले आहे. या नियमाचे उल्लंघन केल्यास पदावरून कमी करण्यासह कठोर शिस्तभंगाची कारवाई होऊ शकते, असा सज्जड दम देण्यात आला आहे. 'नो टू टाइमिंग, नो मूनलाइटिंग' असे या ई-मेलचे शीर्षक आहे.

'मूनलाइटिंग' म्हणजे काय?

'मूनलाइटिंग' अंतर्गत, कर्मचार्‍यांना काही विशिष्ट परिस्थितीत त्यांच्या नोकरीव्यतिरिक्त इतर काम (अर्धवेळ नोकरी) करण्याची परवानगी दिली जाते. मात्र, विप्रोचे अझीम प्रेमजी यांनी 'मूनलाइटिंग'ला फसवणूक म्हणून संबोधले आहे. यानंतर इन्फोसिसच्या एचआर (HR) विभागाने कारवाईचे संकेत दिले आहेत आणि त्याचाच एक भाग म्हणून हा ई-मेल कंपनीच्या सर्व कर्मचा-यांना पाठवला आहे. (Infosys Moonlighting issue)

सोमवारी (दि. 12) जारी करण्यात आलेल्या या ई-मेलमध्ये इन्फोसिसने स्पष्टपणे म्हटले आहे की, कर्मचा-यांना कंपनीच्या आचारसंहितेनुसार दोन ठिकाणी एकाच वेळी काम करण्याची परवानगी नाही. कर्मचाऱ्यांनी कंपनीच्या कामाच्या तासांव्यतिरिक्त इतर कोणत्याही कंपनीसाठी किंवा व्यक्तीसाठी काम करू नये. यासाठी परवानगी दिली जाणार नाही. जर एकाच वेळी दोन संस्थांसाठी काम करणारा कर्मचारी आढळल्यास त्याला पदावरून कमी करण्यासह त्याच्यावर कठोर शिस्तभंगाची कारवाई केली जाईल, असे कंपनीने म्हटले आहे. (Infosys Moonlighting issue)

कंपनीने असे पाऊल का उचलले?

इन्फोसिसच्या एचआर विभागाने पाठवलेल्या ई-मेलमध्ये कंपनीच्या कर्मचाऱ्यांना दिलेल्या ऑफर लेटरच्या काही अटींचा उल्लेख करण्यात आला आहे. यानुसार, इन्फोसिसचे कर्मचारी इन्फोसिस व्यवस्थापनाच्या परवानगीशिवाय संचालक/भागीदार/सदस्य किंवा कर्मचारी म्हणून इतर कोणत्याही कंपनीसाठी पूर्णवेळ किंवा अर्धवेळ काम करू शकत नाहीत. 'मूनलाइटिंग'मुळे कंपनीच्या उत्पादकतेवर परिणाम होऊन हितसंबंध प्रभावित होतात. कंपनीच्या गुप्त माहितीची देवाणघेवाण झाल्यास कंपनीचे आर्थिक नुकसान होते, असे स्पष्ट करण्यात आले आहे. (Infosys Moonlighting issue)

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news