पुणे : कर्जाच्या तगाद्यामुळे जामीनदाराची आत्महत्या; दोघा पोलिसांसह तिघांवर गुन्हा दाखल | पुढारी

पुणे : कर्जाच्या तगाद्यामुळे जामीनदाराची आत्महत्या; दोघा पोलिसांसह तिघांवर गुन्हा दाखल

पुणे; पुढारी वृत्तसेवा; कर्ज प्रकरणात जामीनदार असलेल्या एका व्यक्तीने कर्जदार व पोलिसांच्या त्रासाला कंटाळून गळफास घेतला. सातत्याने नोटीस बजावत त्याच्याकडून पैसे उकळून त्रास देत त्याला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी समर्थ पोलीस ठाण्यातील दोघा पोलिसांसह तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सहायक पोलीस फौजदार भाग्यवान ज्ञानदेव निकम, हवालदार सचिन रामचंद्र बरकडे आणि किरण भातलवांडे अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. तर, राजेंद्र उर्फ राजू राऊत असे आत्महत्या केलेल्याचे नाव आहे. याबाबत राऊत यांच्या २३ वर्षीय मुलीने फिर्याद दिली आहे. ही घटना सोमवारी सकाळी सहा वाजताच सुमारास नाना पेठ परिसरात घडली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी तरुणीचे वडील राजेंद्र राऊत आणि आरोपी किरण हे मित्र आहेत. आरोपी किरण यांनी त्याच्या चारचाकी गाडीवर कर्ज घेतेवेळी राऊत यांना जामीनदार केले होते. मात्र, यानंतर किरण याने कर्जाचे हप्ते भरले नाहीत. त्यामुळे कोर्टाने जामीनदार असलेल्या राऊत यांना नोटीस बजावली.

ही नोटीस घेऊन समर्थ पोलीस ठाण्यातील निकम आणि बरकडे हे सतत राऊत यांच्याकडे येत होते. अटक होऊ नये या भीतीने राऊत यांनी दोघा पोलिसांना वेळोवेळी ७ ते ८ हजार रुपये देखील दिले. यानंतर देखील दोघे पोलीस त्यांच्याकडे जात होते. त्यामुळे राऊत यांनी त्यांचा मित्र असलेल्या किरणला गाडीचे हप्ते भरण्याचे सांगितले. परंतू हप्ते न भरता किरण याने राऊत यानांच जीवे मारण्याची धमकी दिली.

या सर्व प्रकाराला कंटाळून राजेंद्र राऊत यांनी सोमवारी (दि.१२) पहाटे नाना पेठेतील राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. त्यांना आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी दोघा पोलिसांसह तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास समर्थ पोलीस करत आहेत.

Back to top button