बंगळूर- ट्रॅफिकमध्ये अडकलेले डॉक्टर ऑपरेशन करण्यासाठी ३ किलोमीटर धावत गेले | पुढारी

बंगळूर- ट्रॅफिकमध्ये अडकलेले डॉक्टर ऑपरेशन करण्यासाठी ३ किलोमीटर धावत गेले

डॉक्टर ऑपरेशन करण्यासाठी ३ किलोमीटर धावत गेले

बंगळूर : पुढारी ऑनलाईन – बंगळूर शहरात ट्रॅफिक ही फार मोठी समस्या आहे. कामासाठी रोज प्रवास करणाऱ्यांसाठी ट्रॅफिक जाम ही डोकेदुखीच बनली आहे. बंगळुरात एका डॉक्टरला ट्रॅफिक जामचा मोठा मनःस्ताप सोसावा लागला. ऑपेरशन नियोजित असल्यामुळे ट्रॅफिकमध्ये अडकलेल्या या डॉक्टरला ३ किलोमीटर धावत हॉस्पिटलमध्ये जावे लागले.

डॉ. गोविंद नंदकुमार असे त्यांचे नाव आहे. ते पोटविकार तज्ज्ञ आहेत. मणिपाल हॉस्पिटलमध्ये ते कार्यरत आहेत. ३० ऑगस्टला एक महिलेवर पित्ताशयाची शस्त्रक्रिया करायची होती. ही शस्त्रक्रिया सकाळी १० वाजता नियोजित होती. पण डॉ. गोविंद यांची कार बंगळूरमधील सर्जापूर येथील मार्थाली येथे ट्रॅफिकमध्ये अडकली. डॉ. गोविंद यांनी मागचा पुढचा कसलाही विचार न करता गाडी ड्रायव्हरकडे सोपवली, आणि थेट दवाखान्याकडे धाव घेतली. ट्रॅफिक जाम झालेल्या ठिकाणापासून हॉस्पिटल ३ किलोमीटर आहे. इतके अंतर धावत ते हॉस्पिटलला पोहोचले आणि वेळेत शस्त्रक्रिया केली.

Dr Govind
डॉ. गोविंद

“सेंट्रल बंगळूर ते हॉस्पिटल असा मी दररोजच ट्रॅव्हल करतो. ऑपरेशनसाठी मी अगदी वेळेत घरातून निघालो होतो. हॉस्पिटलमध्ये माझी टीम सज्ज होती. जेव्हा ट्रॅफिक जाम झाले, तेव्हा माझ्या लक्षात आले की वेळेवर हॉस्पिटलमध्ये पोहोचता येणार नाही. म्हणून मी ड्रायव्हरला कार घेऊन येण्याची सूचना केली आणि मी धावत हॉस्पिटलला आलो,” असे डॉ. गोविंद यांनी सांगितले.
ज्या रुग्णावर शस्त्रक्रिया झाली आहे, त्याला वेळेत डिसचार्ज दिल्याचे हॉस्पिटलने सांगितले.

हेही वाचा?

Back to top button