सर्वोच्च न्यायालय ही मातृसंस्था अन् कर्मभूमी : सरन्यायाधीश उदय लळीत | पुढारी

सर्वोच्च न्यायालय ही मातृसंस्था अन् कर्मभूमी : सरन्यायाधीश उदय लळीत

मुंबई; पुढारी वृत्तसेवा : वकील व्यवसायात सतत स्वतःला विकसित करणे व सुधारणा करीत राहणे हीच या व्यवसायाची खासियत आहे. सर्वोच्च न्यायालय ही माझी मातृसंस्था आणि कर्मभूमी आहे, असे उद्गार देशाचे नवे सरन्यायाधीश उदय लळीत यांनी येथे शनिवारी काढले.
न्या. उदय लळीत यांचा सायंकाळी मुंबई उच्च न्यायालयाच्या वतीने मुंबईत सत्कार करण्यात आला, त्यावेळी ते बोलत होते.

हॉटेल ताज पॅलेसच्या क्रिस्टल हॉलमध्ये झालेल्या या कार्यक्रमास केंद्रीय विधी व न्यायमंत्री किरेन रिजिजू, सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती भूषण गवई, अभय ओक, मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती दीपांकर दत्ता, अमिता उदय लळीत, झुमा दत्ता, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची उपस्थिती होती. मुंबई उच्च न्यायालयाचे इतर न्यायमूर्ती उपस्थित होते. यावेळी न्यायमूर्ती भूषण गवई, न्यायमूर्ती अभय ओक यांच्या हस्ते सरन्यायाधीश उदय लळीत यांचा हृद्य सत्कार करण्यात आला तसेच संस्कृतमधील गौरव पत्र देण्यात आले. तर झुमा दत्ता यांच्या हस्ते अमिता उदय लळीत यांना मानचिन्ह देण्यात आले.

कलह मिटवणारे लळीत

मी उदयजी लळीत यांना आज पहिल्यांदाच भेटलो आणि त्यांच्या शालीनता, नम्रता, सभ्यता यामुळे आपण प्रभावित झालो आहोत. कोकणात लळीत हा कीर्तन परंपरेतील एक लोककला असून या प्रयोगाच्या शेवटी कीर्तनकार देवाला गार्‍हाणे घालतात. त्यात ते म्हणतात की, आपापसातले कलह मिटोत, मनात किल्मिष ना उरो. कलह मिटविण्याची इच्छा प्रकट करणार्‍या लळितांचे नाव धारण करणारे उदयजी लळीत आज न्यायदानाच्या सर्वोच्च पदावर पोहोचले हा विलक्षण योगायोग असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले.

Back to top button