Ramashankar Gupta : संकल्पपूर्ती झाली आ‍णि तब्बल २१ वर्षांनंतर दाढीला लागली ‘कात्री’ ! | पुढारी

Ramashankar Gupta : संकल्पपूर्ती झाली आ‍णि तब्बल २१ वर्षांनंतर दाढीला लागली 'कात्री' !

छत्तीसगड : पुढारी ऑनलाईन डेस्क : एखादे स्वप्न पूर्ण करण्यासाठी अनेक जण वेगवेगळे संकल्प करतात. काहीचे स्वप्न पूर्ण होते, तर काहीचे स्वप्न अधुरेच राहते; यानंतर ते आपला संकल्प सोडून देतात. (Ramashankar Gupta) छत्तीसगडमधील रमाशंकर गुप्ता यांनीही एक संकल्प केला. मनेंद्रगडचे रहिवासी असलेले रमाशंकर गुप्ता (Ramashankar Gupta) हे आरटीआय कार्यकर्ते असून नव्या जिल्हयाचे स्वप्न पूर्ण झाल्यानंतरच त्यांनी दाढी करून आपला संकल्प सोडला. तब्बल २१ वर्ष ते आपल्या  संकल्पाशी एकनिष्ठ राहीले.

छत्तीसगडमधील मनेंद्रगड-चिरमिरी-भरतपूर (एमसीबी) हा नवा जिल्हा घोषीत करण्याच्या मागणीसाठी रमाशंकर गुप्ता (Ramashankar Gupta) यांनी २१ वर्षे दाढी केली नाही. गेल्या वर्षी ऑगस्टमध्ये छत्तीसगड सरकारने मनेंद्रगड-चिरमिरी-भरतपूर हा राज्याचा ३२ वा नवा जिल्हा म्हणून घोषित केले. परंतु नव्याने घोषित जिल्ह्याचे उद्घाटन होण्यास जवळपास एक वर्षाचा कालावधी लोटला असल्याने गुप्ता यांनी पुन्हा एक वर्ष दाढी केली नाही.

अखेर शुक्रवारी (दि.९) छत्तीसगडचे मुख्यमंत्री भूपेश बघेल यांनी मनेंद्रगड-चिरमिरी-भरतपूर या ३१ व्या नव्या जिल्ह्याचा शुभारंभ केला. जिल्ह्याचे मुख्यालय मनेंद्रगड येथे असेल. तर चिरमिरी येथील १०० खाटांचे रुग्णालय जिल्हा रुग्णालय म्हणून अपग्रेड केले जाईल. यावेळी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते नवीन जिल्ह्यातील २०० कोटी रुपयांच्या विकास प्रकल्पांचे उद्घाटनही करण्यात आले. अखेरीस गुप्ता यांचा संकल्प शुक्रवारी पूर्ण झाला आणि त्यांनी दाढी करून एमसीबी जिल्ह्याच्या जिल्हाधिकाऱ्यांना पहिले निवेदनही दिले.

… हा ४० वर्षांचा संघर्ष होता.

याबाबत गुप्ता म्हणाले की, मनेंद्रगड-चिरमिरी-भरतपूर जिल्हा होत नाही तोपर्यंत मी दाढी काढणार नाही, असा संकल्प केला होता. मनेंद्रगड-चिरमिरी-भरतपूर हा जिल्हा कधीच झाला नसता, तर मी दाढीही केली नसती. हा ४० वर्षांचा संघर्ष होता. जिल्ह्याच्या ओळखीसाठी जे लोक लढले ते सर्व मयत झाले आहेत. आता त्यांच्या आत्म्याला शांती मिळेल.आता नवा जिल्हा अस्तित्वात आल्याने मी मुख्यमंत्री भूपेश बघेल यांचे आभार मानतो. मला आशा आहे की मनेंद्रगड हा फक्त छत्तीसगडचाच नव्हे, तर देशातील एक मॉडेल जिल्हा बनेल, असा विश्वासही गुप्ता यांनी व्यक्त केला.

हेही वाचलंत का ? 

Back to top button