Milk Rate Increase : महागाईमुळे ३३ टक्के घरांत दुधाचा वापर घटला

Milk Rate Increase : महागाईमुळे ३३ टक्के घरांत दुधाचा वापर घटला

नवी दिल्ली; वृत्तसंस्था : दुधाचे दर (Milk Rate Increase) वाढल्यामुळे तीनपैकी एका घरात दुधाचा वापर कमी झाला असल्याचे एका सर्वेक्षणातून स्पष्ट झाले आहे. काहींनी कमी किमतीचे दूध घेण्यास सुरुवात केली आहे, तर काहींनी दुधाचे प्रमाण कमी केले आहे.

समाजमाध्यमांच्या मदतीने सर्वेक्षण करणार्‍या 'लोकल सर्कल्स' या गटाने सर्वसाधारण कुटुंबे महागाईचा कसा सामना करीत आहेत, हे जाणून घेण्यासाठी नुकतेच एक सर्वेक्षण केले. देशभरातील 311 जिल्ह्यांमध्ये हे सर्वेक्षण करण्यात आले. त्यात 21 हजार लोक सहभागी झाले. यात पुरुषांचा सहभाग 69 टक्के होता. यातील 41 टक्के लोक महानगरातील, 34 टक्के लोक मध्यम, तर 25 टक्के लोक छोट्या आणि इतर शहरांमधील होते. देशातील बहुतेक घरांमध्ये दूध, दही, लोणी, तूप, ताक इत्यादी दुग्धजन्य पदार्थांचा सर्वाधिक वापर केला जातो. त्यामुळे भारत हा केवळ दूध उत्पादनातच नव्हे, तर दूधदुभते खाणार्‍यांचाही सर्वांत मोठा देश आहे, असे संयुक् त राष्ट्र संघाच्या दूध आणि उत्पादन अहवालात (2021) म्हटले आहे. (Milk Rate Increase)

दुधाच्या दरात 17 ऑगस्ट रोजी लिटरमागे दोन रुपयांची वाढ झाली. अमूलसारख्या प्रसिद्ध संस्थांनीही दरवाढ केली. या दरवाढीला सामोरे जाताना 68 टक्के लोकांनी तेवढ्याच दर्जाच्या दुधासाठी जादा पैसे मोजत असल्याचे या सर्वेक्षणात सांगितले. 10 हजार 685 पैकी 6 टक्के लोकांनी कमी दर्जाचे किंवा पूर्वी वापरत असलेले स्थानिक दूध आणण्यास सुरुवात केली. दूध घेणे मात्र कोणीही बंद केले नाही. 20 टक्के लोकांनी दुधाचे प्रमाण कमी केल्याचे या सर्वेक्षणात सांगितले.

७२ टक्के लोक वापरतात पाऊच (Milk Rate Increase)

सर्वेक्षणात 10,522 पैकी 72 टक्के लोकांनी दुधाचे 500 मिली किंवा एक लिटरचे पाऊच विकत घेत असल्याचे, तर 12 टक्के लोकांनी स्थानिक पातळीवर मिळणारे बाटलीबंद दूध घेत असल्याचे सांगितले. 14 टक्के लोकांनी स्थानिक विक्रेत्यांकडून सुटे दूध घेत असल्याची माहिती दिली.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news