पुढारी ऑनलाईन डेस्क : देव प्रत्येकवेळी तुमचे संरक्षण करु शकणार नाही म्हणून त्याने आईला पाठवले, आईची महत्ती सांगणारा हा वाक्यप्रचार मध्य प्रदेशमधील उमरिया जिल्ह्यातील एक जगरबाज आई प्रत्यक्ष जगली आहे. आपल्या १५ महिन्यांच्या चिमुकल्याला वाचविण्यासाठी थेट वाघाशी भिडली. ( Mother clashed with tiger ) वाघाच्या जबड्यातून सुटका करत तिने आपल्या मुलाचे प्राण वाचवले.
उमरिया जिल्ह्यात 'बांधवगड व्याघ्रप्रकल्प'आहे. याजवळ रोहनिया गाव आहे. यामुळे या गावात वाघांचा वावर असतो. रविवारी सकाळी ११ वाजता गावात वाघ आला. त्याने भोला प्रसाद यांच्या घरामागे असणार्या १५ महिन्यांचा चिमुकल्या राजबीर याला लक्ष्य केले. यावेळी त्याची आई अर्चना धावत आली.
राजबीर हा वाघाच्या जबड्यात होता. यावेळी अर्चना यांनी आपल्या जीवाची पर्वा न करता थेट वाघावरच प्रतिहल्ला केला. सर्वप्रथम त्यांनी राजबीरला वाघाच्या जबड्यातून सोडवले. या वेळी वाघाने अर्चना यांच्यावर हल्ला केला. अखेर त्यांनी केलेल्या जोरदार प्रतिकारानमुळे वाघाला माघार घ्यावी लागली. आपल्या मुलाचा जीव वाचविण्यासाठी अर्चना यांनी धारण केलेल्या आक्रमक रुप पाहून वाघाने धूम ठोकली.
वाघाच्या हल्ल्यात राजबीर आणि त्याची आई दोघेही जखमी झाले आहेत. त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती सूत्रांनी दिली. त्यांना मानपूर आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले आहे.
हेही वाचा :