राजधानी दिल्लीत शिक्षण घोटाळा; भाजपचा आम आदमी पार्टीवर आरोप | पुढारी

राजधानी दिल्लीत शिक्षण घोटाळा; भाजपचा आम आदमी पार्टीवर आरोप

नवी दिल्ली, पुढारी वृत्तसेवा : राजधानी दिल्लीत धोरणातील अनियमिततेच्या आरोपांवरून राजकीय वातावरण तापले असताना भाजपने दिल्ली सरकारवर शिक्षण घोटाळ्याचा आरोप केला आहे. सीपीडब्ल्यूडी नियमांच्या तरतुदींकडे दुर्लक्ष करीत जवळच्या कंत्राटदारांना सरकारने फायदा पोहचवल्याचा आरोप भाजप प्रवक्ते गौरव भाटिया यांनी केला.

बांधकामांची रक्कम ५० ते ९० टक्क्यांनी वाढवून दाखवण्यात आल्याचा आरोप भाजपने केला आहे. जवळपास ३२६ कोटींची रक्कम वाढवून सांगण्यात आली आहे. तसेच मुलांच्या शौचालयात वर्गखोल्या बनवण्यात आल्याचा दावा करीत ‘आप’ नाही तर ‘पाप’ सरकार असल्याचा आरोप भाटिया यांनी केला.

केजरीवाल सरकारने ५०० नवीन शाळा बनवण्याचे आश्वासन दिले होते. पंरतु, या शाळा उभारण्यात आल्या नाहीत. सीव्हीसी अहवालाचा दाखला देत शाळांमध्ये २ हजार ४०० वर्गखोल्यांची आवश्यकता असताना ७ हजार १८० वर्गखोल्या बांधण्यात आल्या. ६ हजार १३३ वर्गखोल्यांच्या जागी ४ हजार २७ खोल्या बांधण्यात आल्या. नफा कमवण्यासाठी बांधकाम मूल्यात ९० टक्क्यांहून अधिक वाढ करण्यात आली. अडीच वर्षांपूर्वी हा अहवाल सीव्हीसी कडून दिल्ली व्हिजिलंसच्या सचिवांना पाठवण्यात आली होती. या अहवालाची दखल केजरीवाल यांनी का घेतली नाही, असा सवाल भाटिया यांनी केला.

हेही वाचा  

 

Back to top button