दिल्ली उच्च न्यायालयाने बाबा रामदेव यांच्या ‘कोरोनिल’वरील सुनावणी पुढे ढकलली | पुढारी

दिल्ली उच्च न्यायालयाने बाबा रामदेव यांच्या 'कोरोनिल'वरील सुनावणी पुढे ढकलली

नवी दिल्ली, पुढारी वृत्तसेवा : पतंजलीच्या ‘कोरोनिल’ औषधीच्या उपयोगासंबंधी डाॅक्टरांच्या विविध संघटनांकडून दाखल करण्यात आलेल्या याचिकेवरील सुनावणी दिल्ली उच्च न्यायालयाने शुक्रवारी पुढे ढकलली. ३० ऑगस्टला आता याप्रकरणी सुनावणी होणार आहे. न्यायालयीन औचित्य तसेच शिस्त लक्षात घेता सर्वोच्च न्यायालयात अशाप्रकारच्या प्रलंबित मुद्यांवर स्पष्टता येत नाही तोपर्यंत याचिकेवर सुनावणी थांबवणे योग्य ठरेल असे मत खंडपीठाने व्यक्त केले.
या प्रकरणामध्ये कुठली समानता आहे का?  याप्रकरणावर दिल्ली उच्च न्यायालयाने सुनावणी घ्यावी का? यासंबंधीचा निर्णय घेण्यासाठी इंडियन मेडिकल असोसिएशनने (आयएमए) सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित असलेल्या अश्याप्रकारच्या याचिकेची एक प्रत उच्च न्यायालयात सादर करावी, असे निर्देश न्यायमूर्ती अनूप जयराम भंभानी यांनी दिले.
कोरोनाबाधितांच्या मृत्यूसाठी अँलोपॅथी जबाबदार असल्याचे सांगत बाबा रामदेव यांनी नागरिकांची दिशाभूल केल्याचा आरोप करीत डाॅक्टरांच्या संघटनांनी उच्च न्यायालयात धाव घेतली होती. पंतजली निर्मित ‘कोरोनिल’ कोरोनावरील उपचार असल्याचा दावा चुकीची माहिती सादर करीत रामदेव बाबा करीत असल्याचा आरोप देखील याचिकातून करण्यात आला होता. यासंबंधी याचिकेवर तात्काळ सुनावणी घेण्याची विनंती ज्येष्ठ विधिज्ञ कपिल सिब्बल यांच्याकडून करण्यात आली होती. तर,सुनावणी पुढे ढकलण्याची विनंती रामदेव बाबाचे वकील पी.व्ही.कपूर यांच्याकडून करण्यात आली होती.
हेही वाचा

Back to top button