भाजप नेत्या सोनाली फोगाट यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन | पुढारी

भाजप नेत्या सोनाली फोगाट यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन

 

Visual Portfolio, Posts & Image Gallery for WordPress

पणजी : पुढारी वृत्तसेवा : भारतीय जनता पक्षाच्या राष्ट्रीय महिला नेत्या सोनाली फोगाट यांचे आज पहाटे गोव्यामध्ये हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले. बार्देश तालुक्यातील हणजून येथील एका हॉटेलमध्ये त्या उतरल्या होत्या.

हिस्सार दूरदर्शनवर निवेदिका म्हणून त्यांनी २००६ मध्ये आपल्या करिअरला सुरुवात केल्यानंतर २००८ मध्ये त्या भारतीय जनता पक्षाच्या सदस्य झाल्या. पंजाब व हरियाणातील अनेक सिनेमात काम केल्यानंतर त्यांनी म्युझिक व्हिडिओही तयार केले होते. भारतीय जनता पक्षाच्या महिला मोर्चाच्या राष्ट्रीय उपाध्यक्ष या पदाबरोबर इतर जबाबदाऱ्या त्यांनी स्वीकारल्या होत्या. बिग बॉसच्या चौदाव्या हंगामात त्या स्पर्धक होत्या. सोनाली फोगाट या टीक टॉक स्टार म्हणून प्रचंड लोकप्रिय होत्या. त्यांचे लाखो फॉलोअर्स होते. मात्र, गलवानच्या घटनेनंतर भारत सरकारने टिकटॉकवर बंदी आणल्यामुळे फोगाट यांचे अकाउंटही बंद करावे लागले होते.

भाजपमध्ये कार्यरत असताना २०१९ च्या विधानसभा निवडणुकीमध्ये हरियाणा राज्यातील अहमदपूर या विधानसभा मतदारसंघातून भाजपने त्यांना उमेदवारी दिली होती. मात्र, माजी मुख्यमंत्री भजनलाल यांचे पुत्र व काँग्रेसचे उमेदवार कुलदीप बिष्णोई यांच्याकडून त्यांना पराभव पत्करावा लागला. आता बिष्णोई हे सुद्धा भाजपमध्ये आलेले आहेत. निवडणुकीच्या पराभवानंतर फोगाट यांनी धान्य बाजारातील एका अधिकाऱ्याला मारहाण केल्याचा व्हिडिओ सर्वत्र चर्चेचा विषय ठरला होता. फोगाट या गोव्यात आल्या असताना तीव्र हृदयविकाराचा झटका येऊन त्यांचे निधन झाले.

हरियाणाचे मुख्यमंत्री मनोहर लाल खट्टर यांच्यासह भाजपच्या अनेक दिग्गज नेत्यांनी फोगाट यांना श्रद्धांजली वाहिली आहे.

गोवा : 130 पंचायतींवर भाजपची सत्ता

‘आप’ फोडून भाजपमध्ये या, कारवाई थांबवू, मुख्यमंत्री करू

Back to top button