

पणजी; पुढारी वृत्तसेवा : राज्यातील 186 पंचायतींच्या सरपंच व उपसरपंच निवडी सोमवारी शांततेने पार पडल्या. बहुतांश पंचायतींच्या निवडणुका बिनविरोध झाल्या. काही जागी मतदान घेण्यात आले. काही ठिकाणी नव्या चेहर्यांनाही गावाचे कामकाज चालवण्याची संधी मिळाली. या निवडणुका कागदावर पक्षीय पातळीवर झालेल्या नसल्या, तरी भाजपने 130 पंचायतींवर भाजपची सत्ता आल्याचे म्हटले आहे.
सत्तरीतील होंडा पंचायतीत सरपंचपद स्थानिक गावकर पंचाला मिळावे यासाठी गावकरवाडा येथील नागरिकांनी सकाळी मोठ्या संख्येने जमा होऊन तशी जोरदार मागणी केली. त्यामुळे काही प्रमाणात तणाव निर्माण झाला होता. पोलिसांची संख्याही येथे वाढवण्यात आली. मात्र, त्यानंतर मतदान प्रक्रिया पार पडली. ज्यात शिवदास माडकर हे 8 विरुद्ध 3 मतांनी विजयी झाले. सत्तरीतील इतर पंचायतींचे सरपंच व उपसरपंच बिनविरोध निवडले गेले. तिसवाडी तालुक्यातील सांत आंद्रे मतदारसंघातील आजोशी मंडुर या पंचायतीवर रिव्यॅल्युशनरी गोवन्स (आरजी) ची सत्ता प्राप्त झाली. मात्र, इतर सहा पंचायतींवर भाजपचे माजी आमदार फ्रान्सिस सिल्वेरा यांच्या समर्थकांनी सरपंच व उपसरपंच पदे पटकावली.
एकूणच राज्यातील 186 पंचायतीचे सरपंच व उपसरपंच निवडण्यासाठी पंचायत खात्याने सर्व प्रक्रिया सुरळीत पार पाडली. पंचायत खात्याच्या संचालक सिद्धी हळर्णकर यांनी सर्व ठिकाणी निवडणूक पर्यवेक्षक नेमले होते. त्यांनी मतदान प्रक्रिया घेतली. 186 पंचायतीच्या 1464 प्रभागासाठी 10 ऑगस्ट रोजी मतदान घेण्यात आले होते. त्यापूर्वी 64 उमेदवार बिनविरोध निवडून आले होते. दि. 12 रोजी मतमोजणी झाल्यानंतर 150 च्यावर पंचायतीवर सत्ताधारी भारतीय जनता पक्षाच्या समर्थकांनी सत्ता पटकावली होती. निकालानंतर सरपंच आणि उपसरपंच पद मिळवण्यासाठी बरेच राजकीय लॉबींग झाले. स्थानिक आमदारांनी पंचायती आपल्या ताब्यात राहाव्यात यासाठी नवनियुक्त पंचांना आमिषे दाखवली, काहीं पंचांना त्यांच्या घरातील व्यक्तीला सरकारी नोकरीचे आमिष दाखवण्यात आले. शेवटी सोमवारी सरपंच व उपसरपंच निवड झाली.
महिला राज आणि पुरुष राज सत्तरीतील ठाणे पंचायतीत महिला राज आले आहे. अस्नोडा, कोलवाळ या सोबतच ठाणे पंचायतीची सरपंच व उपसरपंच ही दोन्ही पदे महिलांना बिनविरोध मिळाली आहेत. तसेच फोंडा तालुक्यातील केरी, डिचोली तालुक्यातील अडवलपाल, मुरगाव तालुक्यातील कुठ्ठाळी , पेडणे तालुक्यातील अमेके पोरस्कोडे या पंचायतीत सरपंचपद व उपसरपंचपद महिलांना मिळाले असल्याने या सर्व पंचायतीवर महिला राज आले आहे तर सत्तरीतील गुळेली पंचायत, फोंडा तालुक्यीतील बोरी पंचायत, बार्देशमधील पर्रा पंचायतीवर सरपंच व उपसरपंच ही दोन्ही पदे पुरुषांना देण्यात आली आहेत.
पूर्वी जे पंच निवडून येत होते त्यातील अनुभवी ज्येष्ठ पंच सरपंच होत असत. मात्र आता चारवेळा निवडून आलेल्या पंचाला सरपंच व्हावेसे वाटते तसेच पहिल्यांदाच निवडून आलेल्यालाही आपले नाव सरपंचपदाच्या यादीत समाविष्ट व्हावे असे वाटते. त्यामुळे स्थानिक आमदार, मंत्र्यांना सर्वाना सोबत ठेवण्यासाठी सरपंच व उपसरपंच पदाची वाटणी घालावी लागते. अलिखीत करार केले जातात. अमुकांने दोन वर्षे पद भोगल्यानंतर अमुक पंच पुढील दीड वर्षे व त्यानंतर तिसरा पंच दीड वर्षे पदावर येईल. असाच प्रकार उपसरपंच पदासाठी घडलेला आहे. त्यामुळे राज्यातील बहुतांश पंचायतीत पुढील पाच वर्षात संगीत खुर्चीचा खेळ पहायला मिळणार आहे.
गोवा भाजप अध्यक्ष सदानंद शेट-तानावडे म्हणाले, राज्यातील 186 पैकी सुमारे 130 च्या आसपास पंचायतींवर भारतीय जनता पक्षाचे समर्थक सरपंच व उपसरपंच झाले आहेत. यापूर्वी इतकेमोठे यश भाजपला मिळाले नव्हते. काही पंचायतींवर अपक्षांची सत्ता आली. विरोधी पक्षांच्या हाताला अवघ्याच पंचायती लाभल्या आहेत.
बार्देश तालुक्यातील कळंगुट या महत्त्वाच्या पंचायतीवर आमदार मायकल लोबो यांचे कट्टर विरोधक, भारतीय जनता पक्षाचे विधानसभा उमेदवार जोसेफ सिक्वेरा यांचे पॅनेल निवडून आले होते. आज सिक्वेरा यांची कळंगुटचे सरपंच म्हणून बिनविरोध निवड झाली.
राज्यातील सुमारे 50 च्यावर पंचायतींत सरपंच व उपसरपंच ठरवण्यासाठी मतदान घ्यावे लागले. यात सासष्टीतील 24 पंचायतींचा समावेश आहे. होंडा (सत्तरी), पिळगाव (डिचोली), कासावली-आरोशी तसेच केशळी (सासष्टी), चिखली तसेच साखवाळ (मुरगाव), माजोर्डा (सासष्टी) या काही महत्त्वाच्या पंचायतींत मतदान झाले.
धारबांदोडा तालुक्यातील किर्लपाळ दाबाळ पंचायतीवर रुक्मिणी गावकर या 72 वर्षांच्या महिला सरपंच बिनविरोध निवडून आल्या आहेत.