‘आप’ फोडून भाजपमध्ये या, कारवाई थांबवू, मुख्यमंत्री करू

‘आप’ फोडून भाजपमध्ये या, कारवाई थांबवू, मुख्यमंत्री करू

नवी दिल्ली ः 'आम आदमी पार्टी तोडण्याचा' संदेश भाजपकडून आल्याचा आरोप दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांनी केला आहे. 'आप' पक्ष फोडून भाजपमध्ये आलात तर सध्या सुरू असलेली तपास संस्थांची कारवाई थांबेल, मुख्यमंत्रीही करू, असे लालूच भाजपने दाखविल्याचा आरोप सिसोदिया यांनी केला.

माझ्यावर दाखल केलेले सगळे गुन्हे खोटे आहेत, जे करायचे आहे ते करा, असे आव्हानदेखील सिसोदिया यांनी भाजपला दिले आहे. अबकारी धोरणात करण्यात आलेल्या बदलाची चौकशी करण्याची शिफारस उपराज्यपाल व्ही. के. सक्सेना यांनी सीबीआयला केली होती. त्यानुसार गेल्या आठवड्यात सीबीआयने सिसोदिया यांच्या दिल्लीतील निवासस्थानासह सात राज्यांत छापेमारी केली होती.
दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आणि सिसोदिया हे दोघेही सोमवारी गुजरात दौर्‍यावर रवाना झाले. या पार्श्‍वभूमीवर सिसोदिया ट्विटमध्ये पुढे म्हणतात की, गेल्या 27 वर्षांत भाजपने गुजरातसाठी जे केले नाही,

ते केजरीवाल सरकार करून दाखवेल. ज्या प्रकारचे काम दिल्लीत झाले आहे, तशा प्रकारचे काम सध्या पंजाबमध्ये सुरू आहे. या कामामुळे प्रभावित होऊन गुजरातची जनता केजरीवाल यांना एक संधी देऊ पाहात आहे. दरम्यान मुख्यमंत्री केजरीवाल यांनी देखील सिसोदिया यांना जाणीवपूर्वकपणे अबकारी धोरण प्रकरणात अडकवले जात असल्याचे सोशल मीडियाच्या माध्यमातून सांगितले आहे.
दरम्यान, सिसोदिया यांच्या या वक्‍तव्यानंतर भाजप कार्यकर्त्यांनी अरविंद केजरीवाल यांच्या निवासस्थानाबाहेर आंदोलन केले. तर सीबीआयने दिल्ली सरकारला आणखी एक झटका देताना 1000 लो फ्लोअर बसच्या खरेदीतील कथित भ्रष्टाचारावरून एफआयआर नोंदवला आहे.

मी महाराणा प्रताप यांचा वंशज आहे. राजपूत आहे. शिर कापेन पण भ्रष्टाचारी-षड्यंत्र रचणार्‍यांसमोर झुकणार नाही.
– मनीष सिसोदिया, उपमुख्यमंत्री, दिल्ली

दिल्लीत 'ऑपरेशन लोटस' अपयशी ः केजरीवाल

इतर राज्यांप्रमाणे भाजप दिल्लीतही ऑपरेशन लोटस करणार होती, पण दिल्लीत ते अपयशी ठरले आहे. सीबीआयचे छापे भ्रष्टाचाराच्या चौकशीसाठी नाही तर सरकार पाडण्यासाठी टाकले गेले. सर्वसामान्य माणूस महागाईशी झुंजत आहे. सरकारने त्यावर उपाय करण्याऐवजी दररोज सकाळी केंद्र सरकार सीबीआय-ईडीचा खेळ सुरू करते.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news