स्वातंत्र्यदिनाच्या पार्श्वभूमीवर लाल किल्ल्याला छावणीचे स्वरूप | पुढारी

स्वातंत्र्यदिनाच्या पार्श्वभूमीवर लाल किल्ल्याला छावणीचे स्वरूप

नवी दिल्ली,पुढारी वृत्तसेवा : देश स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव साजरा करीत आहे.सोमवारी स्वातंत्र्य दिनानिमित्त देशवासीय सज्ज झाले आहेत. राजधानी दिल्लीतील लाल किल्ल्यावर आयोजित स्वातंत्र्यदिनाच्या मुख्य सोहळ्यातून पंतप्रधान नरेंद्र मोदी ध्वजारोहण करीत मुघलकालीन स्मारकाच्या तटबंदीवरून देशाला संबोधित करतील.
या पार्श्वभूमीवर लाल किल्ल्यासह राजधानी दिल्लीला छावणीचे स्वरूप प्राप्त झाले आहे. लाल किल्ल्याच्या परिसरात अँटीड्रोन सिस्टिम आणि अन्य यंत्रणा तैनात करण्यात आल्या आहेत. किल्ल्याच्या प्रवेशद्वारावर ‘एफआरएस’ यंत्रणा बसविण्यात आली आहे. शिवाय लाल किल्ला ते शीशगंज गुरूद्वारा व गौरीशंकर मंदिरापासून फतेहपुरी मशिदीपर्यंत ‘हाय रिझॉल्यूशन कॅमेरे’ जवानांसोबतच पहारा राहील देतील.
स्वातंत्र्यदिन सोहळ्यावेळी जेवणाचे डबे, पाण्याच्या बाटल्या, रिमोट कंट्रोल्ड कारच्या चाव्या, लायटर, ब्रीफकेस, हॅंडबॅग, कॅमेरे, दुर्बिणी आणि छत्र्या आणण्यास मनाई असेल. या ५ किलोमीटर परिसरातील शुक्रवार बाजार, अजमेरी गेट भागातील बाजार, गालिब इन्स्टिट्यूट परिसरातील सुरक्षा यंत्रणा वाढविण्यात आली आहे. दिल्लीत गेल्या आठवडाभरापासून पावलापावलावर पोलिस यंत्रणांची तीक्ष्ण नजर आहे.

संपूर्ण दिल्लीत कलम १४४ जारी करण्यात आले असून संसद भवन व राष्ट्रपती भवनासह महत्वाच्या परिसरात ठिकठिकाणी सशस्त्र पोलिसांचा जागता पहारा सुरू आहे. तब्बल १० हजार पोलिस, निमलष्करी व लष्करी जवानांनी दिल्लीत डोळ्यात तेल घालून पहारा देत आहेत. यंदाच्या स्वातंत्र्यदिन सोहळयातही सोशल डिस्टन्सिंगसह कोरोनाचे आरोग्य नियम काटेकोरपणे पालन करणे बंधनकारक आहे.

लाल किल्ला परिसराला छावणीचे स्वरूप आले आहे. पंतप्रधानांच्या सुरक्षेसाठी सात पदरी सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आली आहे. पोलिस, निमलष्करी दले व लष्कराचे हजारो जवान, हवाई दल व लष्कराच्या यंत्रणाही सज्ज आहेत.लाल किल्ल्यावरील झेंडावंदन व पंतप्रधानांचे भाषण, या कार्यक्रमास शालेय मुलांसह ७ हजार विशेष आमंत्रितांना विशिष्ट टॅगसह आमंत्रणपत्रे रवाना करण्यात आली आहेत.दिल्ली गेटपासून चांदनी चौक, दरियागंज, जामा मशीद या संपूर्ण परिसरातील बंदोबस्त आजपासूनच वाढविण्यात आला असून ठिकठिकाणी ४०० काईट कॅचर तैनात करण्यात आली आहेत. लाल किल्ल्याचा ५ किमीचा परिसर ‘नो काईट फ्लाईट झोन’ घोषित करण्यात आला आहे.
हेही वाचा 

Back to top button