रत्नागिरी : मुंबई-गोवा महामार्गाबाबत केंद्रीय मंत्री गडकरींची भेट घेणार : मंत्री उदय सामंत | पुढारी

रत्नागिरी : मुंबई-गोवा महामार्गाबाबत केंद्रीय मंत्री गडकरींची भेट घेणार : मंत्री उदय सामंत

खेड; पुढारी वृत्तसेवा : मुंबई-गोवा महामार्गाच्या कामाबाबत कोकणी जनतेच्या तक्रारी मांडण्यासाठी केंद्रीय मंत्री नितीन गडकरींची भेट घेणार असल्‍याचे मंत्री उदय सामंत यांनी सांगितले. रविवारी (दि १४ रोजी) पत्रकारासोबत बोलताना त्‍यांनी ही माहिती दिली. राज्य मंत्रीमंडळात उदय सामंत यांची उद्योग मंत्री पदी वर्णी लागली. रत्नागिरी जिल्ह्याचे प्रवेशद्वार असलेल्या खेडमध्ये आज (दि १४ रोजी) त्यांचे आ. योगेश कदम व कार्यकर्त्यांनी जल्लोषात स्वागत केले.

रत्नागिरीचे आमदार उदय सामंत यांचा समावेश शिंदे-फडणवीस सरकारमध्ये झाल्यानंतर रविवारी  त्यांचे रत्नागिरी जिल्ह्यात आगमन झाले. त्यांच्या स्वागतासाठी खेड तालुक्यातील कशेडी घाट येथे शेकडो कार्यकर्ते पोहोचले होते. वाहनांच्या ताफ्यात उदय सामंत हे भरणे नाका येथील श्री काळकाई देवीचे दर्शन घेतले. त्यानंतर खेड शहरातील तीनबत्ती नाका येथे आ.योगेश कदम यांनी शेकडो कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत ना.उदय सामंत यांचे स्वागत केले. यावेळी महिला कार्यकर्त्यांनी त्यांचे औक्षण केले.

सामंत यांनी योगिता दंत महाविद्यालय येथे पत्रकार परिषदेत संवाद साधला. ते म्हणाले, शिवसंग्राम संघटनेचे प्रमुख आ. विनायक मेटे यांचे निधन झाल्याने मराठा समाजाचे व महाराष्ट्राची मोठी हानी झाली आहे. या दुःखाच्या प्रसंगामुळे आम्ही सर्व नियोजित कार्यक्रम रद्द करून आ.मेटे यांना श्रध्दांजली अर्पण करत आहोत.

या दौऱ्यात मुंबई-गोवा महामार्ग हा कोकणातील जनतेच्या जिव्हाळ्याचा विषय आहे. या मार्गाची मी पाहणी करत आहे. परशुराम घाट व पर्यायी मार्ग वाहतुकीस सुलभ रहावा म्हणून या कशाप्रकारे निधी खर्च करता येईल हे तपासून पाहणे गरजेचे आहे. राष्ट्रीय महामार्गाच्या बाबतीत कशेळी ते राजापूर भागातील समस्या सोडविण्यासाठी वेळ पडल्यास आ.योगेश कदम व मी स्वतः केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची भेट घेणार आहे, असे सामंत यांनी सांगितले. यावेळी आ. योगेश कदम, अरुण कदम, पदाधिकारी व कार्यकर्ते आदी उपस्थित होते.

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे विचार आम्ही पुढे घेऊन जात आहोत. शिवसेना भक्कम करण्यासाठी आम्ही कटिबद्ध असून कोणी संभ्रम पसरवत असतील तर त्यावर कार्यकर्त्यांनी विश्वास ठेऊ नये. येत्या काळात कोकणात पक्ष संघटन अधिक बळकट करण्यासाठी चिपळूण, रत्नागिरी व सिंधदुर्ग येथे मध्यवर्ती कार्यालय सुरू केली जाणार आहेत.
उदय सामंत, उद्योग मंत्री

हेही वाचा

Back to top button