नवी दिल्ली : वृत्तसंस्था देशभर दहशतवादी कारवाया करणार्या दहशतवादी संघटना लश्कर-ए-तोयबा, जैश-ए-मोहम्मद आणि अलकायदा यांना कुख्यात देशद्रोही डॉन दाऊद इब्राहिमची टोळी म्हणजेच डी कंपनी मोठ्या प्रमाणावर निधी देत असल्याची धक्कादायक माहिती उजेडात आली आहे. विशेष म्हणजे हे पैसे डी गँग मुंबईतून कमावते आणि अतिरेक्यांना पुरवते. दाऊदसाठी काम करणार्या सलीम फ्रूटच्या चौकशीतूनच हा धक्कादायक उलगडा झाला.
मोहम्मद सलीम मोहम्मद इक्बाल कुरेशी ऊर्फसलीम फ्रूट याला एनआयएने 4 ऑगस्ट रोजी मुंबई सेंट्रलच्या मीर अपार्टमेंटमधून अटक केली होती. सलीम याच्याकडून काही महत्त्वाची कागदपत्रेही जप्त करण्यात आली आहेत. सलीम फ्रूट हाच मुंबईत छोटा शकीलच्या नावाने डी कंपनीचे बेकायदेशीर व्यवहार सांभाळत होता. मुंबईतून वसूल केलेला पैसा हवाला आणि डिजिटल माध्यमांद्वारे थेट लश्कर-एतोयबा, जैश-ए-मोहम्मद आणि अल-कायदाला पाठवण्यासाठी सलीम फ्रूट डी कंपनीला मदत करत होता, असे स्पष्ट झाले आहे.
पाकिस्तानात चोरून लपून राहणारा दाऊद आजही मुंबईतील खंडणीचे साम्राज्य चालवतो. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मुंबईत मालमत्तांचे व्यवहार आणि मोठमोठ्या उद्योगपतींमधील वाद सोडवण्यासाठी डी कंपनी कोट्यवधी रुपयांची खंडणी घेते. हे कोट्यवधी रुपये थेट लश्कर, जैश आणि अलकायदाला पाठवले जातात. याव्यतिरिक्त नशेचा व्यवसाय, सोने तस्करी आणि इतर माध्यमांतून कमवण्यात आलेला पैसाही दाऊदच्या इशार्यावरून दहशतवादी संघटनांना पाठवण्यात येत होता, अशीही माहिती सलीमच्या चौकशीत उघड झाली आहे.
हेही वाचा