

सोलापूर : पुढारी वृत्तसेवा : पेट्रोलियम मंत्रालयाने ऑइल कंपन्यावरील निर्बंध उठवले, त्यानंतर पंप चालकांचे क्रेडिट व्यवहारावर बंधने आणली. यामुळे ऑइल कंपन्यांकडे असलेल्या पंप चालकांची पत संपली आणि उधारीचा व्यवहार बंद झाले आहेत. यामुळे पंप चालकांच्या अडचणी पुन्हा वाढल्या आहेत.
दैनंदिन वाढणाऱ्या इंधनाच्या दराबरोबरच पेट्रोल पंप चालकांच्या अडचणीत दिवसेंदिवस वाढच होत आहे. त्यांना देण्यात येणाऱ्या कमिशनच्या रकमेमध्ये दीर्घकाळापासून वाढ झाली नाही. कमिशन वाढवण्याच्या मागणीसाठी त्यांची लढाई सुरू असतानाच मार्चपासून ऑईल कंपन्यांनी उधारीवर इंधन देण्याचे बंद केले. यामुळे पंप चालकांना आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत आहे.
पूर्वी एक लोड म्हणजे १२ हजार लिटर किंवा २० हजार लिटर इंधन उधारीवर देण्यात येत होते. याचा खरेदी व्यवहार सुमारे २० ते ४० लाख रुपयापर्यंतचा येतो. आता पतवर व्यवहार करण्याचे निर्णय मागे घेण्यात आल्याने पेट्रोल पंप चालकांना रोखीने पेट्रोल, डिझेल घ्यावे लागत आहे. यामुळे त्यांना आर्थिक तरतूद करावी लागत आहे. आर्थिक विवंचनेमुळे काही पंपावर डिझेल, पेट्रोलचा तुटवडाही जाणवत आहे. याचा थेट परिणाम वाहनधारकांवर होत आहे. क्रेडिटवर इंधन देण्याचा व्यवहार कंपनीने का बंद केला, असा प्रश्न पंप चालकांना सध्या सतावत आहे.
दिवसेंदिवस पंपांच्या संख्या वाढत असून यामुळेही विक्रीवर परिणाम होत आहे. शिवाय डीएसएम (ड्रायवे सेल्समॅन), इतर कर्मचारी, स्वच्छता गृहे, पिण्याचे पाणी, हवा, परिसराची स्वच्छता, विजेची सोय, जनरेटर या सुविधा पंप चालकांना द्याव्या लागतात. यावर होणारा खर्चही प्रचंड आहे. अशात ऑइल कंपन्यांनी उधारी बंद केल्याने पंपचालकांच्या अडचणी वाढल्या आहेत.
इंधनाचे दरही वाढले आहेत. त्या तुलनेत पंप चालकांच्या कमिशनमध्ये वाढ झालेली नाही. सोयीसुविधावर मोठा खर्च करावा लागत आहे. अशात रोखीने व्यवहार करावा लागत असल्यामुळे पंप चालकांच्या अडचणी वाढल्या आहेत. ऑइल कंपन्यांनी पंप चालकांच्या अडचणी लक्षात घ्याव्यत. तसेच ग्रामीणभागातील पेट्रोल पंप – ३४७ तर शहरात ५० पेक्षा जास्त पंप आहेत.
-महेंद्र लोकरे, सचिव, सोलापूर जिल्हा पेट्रोल पंप असोसिएशन
हेही वाचा