भीमा-कोरेगाव प्रकरणी पी. वरवरा राव यांना सुप्रीम कोर्टाकडून जामीन मंजूर | पुढारी

भीमा-कोरेगाव प्रकरणी पी. वरवरा राव यांना सुप्रीम कोर्टाकडून जामीन मंजूर

नवी दिल्ली : पुढारी वृत्तसेवा; भीमा कोरेगाव हिंसाचार (Bhima Koregaon Case) प्रकरणातील आरोपी कार्यकर्ते आणि कवी डॉ. पी वरवरा राव यांना वैद्यकीय कारणास्तव सर्वोच्च न्यायालयाने (Supreme Court of India) अंतरिम जामीन मंजूर केला आहे. वैद्यकीय कारणास्तव मुंबई उच्च न्यायालयाने फेब्रुवारी 2021 मध्ये राव यांना तात्पुरता जामीन दिला होता. मात्र त्यानंतर कायमचा जामीन देण्यास नकार दिला होता. यावर राव यांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. अखेर सर्वोच्च न्यायालयाने राव यांना नियमित जामीन दिला आहे.

जामीन देताना सर्वोच्च न्यायालयाने डॉ. पी वरवरा राव यांना काही अटी घातल्या आहेत. यामध्ये तुरुंगातून सुटल्यानंतर ज्या भागात खटला सुरु आहे, तो भाग सोडून इतरत्र जाऊ नये तसेच जामिनाच्या स्वातंत्र्याचा गैरफायदा घेऊ नये, तपासावर कसल्याही प्रकारचा प्रभाव टाकू नये आणि साक्षीदारांना भेटू नये, असेही सर्वोच्च न्यायालयाने राव यांना सांगितले आहे.

तुमचे वय 82 वर्षे आहे, त्यामुळे केवळ वैद्यकीय कारणास्तव जामीन दिला जात आहे, अशी टिप्पणी न्यायालयाकडून करण्यात आली. वरवरा राव यांना ऑगस्ट 2018 मध्ये पहिल्यांदा अटक करण्यात आली होती. त्यावेळी त्यांना घरात नजरकैदेत ठेवण्यात आले होते तर नंतर पोलिसांनी अटक केली होती. राव यांच्या जामीन अर्जाला राष्ट्रीय गुन्हे संस्था अर्थात एनआयएने विरोध केला. राव हे सातत्याने देशविरोधी कारवायांमध्ये सामील असल्याचा युक्‍तिवाद एनआयएकडून करण्यात आला होता.

हेही वाचा:

 

Back to top button