CWG 2022 : बॅडमिंटनमध्ये सात्विक साईराज, चिराग शेट्टी जोडीने पटकावले तिसरे सुवर्ण | पुढारी

CWG 2022 : बॅडमिंटनमध्ये सात्विक साईराज, चिराग शेट्टी जोडीने पटकावले तिसरे सुवर्ण

बर्मिंगहॅम; पुढारी ऑनलाईन : राष्ट्रकूल क्रीडा स्पर्धेत (CWG 2022) भारताच्या पुरुष जोडीने बॅडमिंटन दुहेरीमध्ये तिसरे सुवर्ण पदक पटकावले. सात्विक साईराज रंकरेड्डी आणि चिराग शेट्टी या जोडीने बॅडमिंटनच्या दुहेरीत भारताला आणखी एक सुवर्ण पदक मिळवून दिले. या आधी भारताच्या लक्ष सेन आणि पी. व्ही. सिंधु यांनी भारताला बुधवारी बॅडमिंटन एकेरीमध्ये सुवर्ण पदक प्राप्त करुन दिले. त्यानंतर सात्विक साईराज आणि चिराग शेट्टी यांच्या जोडीने तिसरे सुवर्ण जिंकत बॅडमिंटनमध्ये सुवर्ण पटकावण्याची हॅटट्रीक नोंदवली. इंग्लंडच्या बेन लॅन आणि सिअन वेंडी या जोडीचा पराभव करत अंतिम सामन्यात सात्विक साईराज आणि चिराग शेट्टी यांच्या जोडीने विजयास गवसणी घातली.

भारताच्या पुरुष जोडीने इंग्लंडच्या जोडीवर पहिल्या गेममध्ये २१-१५ अशा फरकाने मात केली. यावेळी इंग्लंडच्या खेळाडूंनी भारतीयांचा चांगलाच प्रतिकार केला. दुसऱ्या गेम मध्ये देखिल इंग्लंडच्या बेन लॅन आणि सिअन वेंडी या जोडीने भारताच्या सात्विक साईराज आणि चिराग शेट्टी या जोडीला चांगलाच घाम फोडला. पण, सात्विक आणि चिराग यांनी सुरुवाती पासून आघाडी कायम ठेवत दुसरा गेम देखिल २१ -१३ अशा फरकाने जिंकत विजयावर मोहर उमटवली. अत्यंत अटीतटीच्या या सामन्यात भारतीय जोडीने आपला अनुभव पणास लावत प्रतिस्पर्धी संघाचे सर्व डावपेच उधळवले. दोन्ही गेम मध्ये आघाडी कायम ठेवत वरचढ ठरु पाहणाऱ्या प्रतिस्पर्धी जोडीला गुणांमध्ये आघाडी घेऊ दिले नाही. त्यामुळे सामन्यात अखेर पर्यंत भारतीय खेळाडूंनी वर्चस्व कायम ठेवत सुवर्ण कामगिरी नोंदवली. (CWG 2022)

या विजयानंतर बॅडमिंटनमध्ये भारताने ३ सुवर्ण पटाकावले. तर यंदाच्या राष्ट्रकूल स्पर्धेत तब्बल २२ सुवर्ण पदके मिळवण्याची कामगिरी भारतीयांनी बजावली आहे. सोमवारचा दिवस पूर्णपणे भारतीय बॅडमिंटनचा ठरला. लक्ष सेन आणि पी. व्ही. सिंधू यांनी एकेरीमध्ये तर सात्विक साईराज आणि चिराग शेट्टी यांच्या जोडीने दुहेरीमध्ये भारताला सुवर्ण पदक मिळवून देत ऐतिहासिक कामगिरी नोंदवली. (CWG 2022)

Back to top button