पुढारी ऑनलाईन डेस्क : खाद्यतेलाच्या किमती (Edible oil price) आणखी कमी होण्याची शक्यता आहे. याआधी खाद्यतेलाचे दर प्रति लिटर ३० रुपयांनी कमी झाले होते. आता आणखी १० ते १२ रुपयांनी खाद्यतेल स्वस्त होऊ शकते. एका रिपोर्टनुसार, जागतिक किमतीतील घसरणीचा फायदा ग्राहकांपर्यंत पोहोचवण्यासाठी खाद्यतेल प्रोसेसर आणि उत्पादकांनी खाद्यतेलाच्या किमतीत १० ते १२ रुपयांनी कपात करण्याचे मान्य केले आहे. जागतिक स्तरावर तेलाच्या किमती कमी झाल्या आहेत. यामुळे देशातील खाद्यतेल उत्पादकांनी दर कमी करण्यास सहमती दर्शवली आहे.
भारत हा खाद्यतेलाचा एक प्रमुख आयातदार देश आहे. देशातील एकूण खाद्यतेलापैकी जवळपास दोन तृतीयांश खाद्यतेल आयात केले जाते. रशिया-युक्रेन युद्ध आणि इंडोनेशिया आणि इतर काही देशांनी पाम तेलाच्या निर्यातीवर घातलेल्या बंदीमुळे अलीकडच्या काही महिन्यांत तेलाच्या किमती प्रचंड वाढल्या होत्या. पण, हल्लीच इंडोनेशियाने पाम तेल निर्यातीवरील बंदी उठवली आहे. यामुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतील खाद्यतेलाच्या किमती कमी होण्यास मदत झाली आहे. यामुळे देशांतर्गत बाजारात तेलाच्या किमती आणखी कमी होऊ शकतात. खाद्यतेलाच्या एमआरपीमध्ये कपात करण्याचे निर्देश अन्न आणि सार्वजनिक वितरण विभागाने गेल्या महिन्यात प्रमुख खाद्यतेल संघटनांसोबतच्या बैठकीत दिले होते.
सध्या खाद्यतेलाच्या किमती १५० रुपयांवर आहेत. ग्राहक मंत्रालयाच्या माहितीनुसार, शेंगदाणा तेल १८७.५५ रुपयांवर आहेत. सध्या सरसो तेलाचा दर प्रति लिटर १७३ रुपये आहे. एक महिन्यापूर्वी सरसो तेलाचा दर १७८ रुपयांवर होता. सोया तेलाचे दर एक महिन्यापूर्वी १० रुपयांनी कमी झाले होते. हे तेल १६५ रुपयांवरुन १५७ रुपयांवर आले आहे.
नुकतीच खाद्यतेलांच्या (Edible oil price) १५ किलोच्या डब्यामागे २०० ते ३०० रुपयांनी घट झाली आहे. किरकोळ बाजारात एक लिटर तेलाची पिशवी २० ते ३० रुपयांनी स्वस्त झाल्यामुळे सामान्य जनतेला मोठा दिलासा मिळाला आहे. फेब्रुवारी महिन्यापासून खाद्यतेलाच्या दरात टप्प्याप्प्प्याने वाढ होत गेली. रशिया-युक्रेनमधील युद्धामुळे सूर्यफूल तेलाची आवक कमी झाली. त्यानंतर इंडोनेशिया, मलेशियात पामतेलाचे उत्पादन कमी झाल्याने तेथील स्थानिक बाजारात पामतेलाचा तुटवडा जाणवू लागला. दक्षिण अमेरिकेतील देशांतील हवामान बदलामुळे सोयाबीनची लागवड कमी झाल्याने भारतात सोयाबीन तेलाचा पुरवठा कमी प्रमाणावर होत होता. जागतिक बाजारपेठेतील या घडामोडींमुळे पामतेल, सोयाबीन तेल, सूर्यफूल तेलाच्या दरात मोठी वाढ झाली होती.
तेलाची आवक करणार्या काही देशांनी पामतेल निर्यातीवर निर्बंध घातले असून त्याचाच परिणाम म्हणून भारतात तेलाचे दर वाढले होते. मात्र जागतिक बाजारपेठेतून गेल्या महिनाभरापासून खाद्यतेलांचा पुरवठा सुरळीत झाल्यानंतर सूर्यफूल, सोयाबीन, पामतेलाच्या दरात घट झाली आहे. शेंगदाणा तेलाचे दर टिकून आहेत. जागतिक बाजारपेठेतील घडामोडींवर खाद्यतेलाचे दर अवलंबून असतात. खाद्यतेलांचा पुरवठा सुरळीत झाला आहे.
हे ही वाचा :