लोकसभेत काँग्रेस खासदारांकडून पुन्हा फलकबाजी, गदारोळामुळे कामकाज तहकूब | पुढारी

लोकसभेत काँग्रेस खासदारांकडून पुन्हा फलकबाजी, गदारोळामुळे कामकाज तहकूब

नवी दिल्ली; पुढारी वृत्तसेवा : फलकबाजी करणार्‍या चार खासदारांचे निलंबन मागे घेण्यात आले असताना आज पुन्हा लोकसभेत काँग्रेसच्या खासदारांकडून सरकार विरोधाचे फलक दाखविण्यात आले. कॉंग्रेससह इतर विरोधी पक्षांनी घातलेल्या प्रचंड गदारोळामुळे सदनाचे कामकाज थांबविण्यात आले. वाढती महागाई, तपास संस्थांचा कथित गैरवापर, खाद्यान्न वस्तुंवरील जीएसटी कर आदी मुद्यांवरुन विरोधक संसदेत आक्रमक झाले होते.

लोकसभेत सकाळी ११ वाजता कामकाजाला सुरुवात झाली. सुरूवातीलाच विरोधी सदस्यांनी अध्यक्ष ओम बिर्ला यांच्या आसनासमोरील मोकळ्या जागेत धाव घेऊन घोषणाबाजी करण्यास सुरुवात केली. अध्यक्षांनी गदारोळातच अर्धा तास कामकाज सुरू ठेवले. या काळात पाच प्रश्नांवर मंत्र्यांनी उत्तरे दिली. पण गदारोळामुळे अध्यक्षांना कामकाज दुपारी दोन वाजेपर्यंत तहकूब करावे लागले. सदनात फलक दाखविल्यास कारवाई केली जाईल, असा इशारा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी वारंवार दिलेला आहे. मात्र असे असूनही लोकसभेत फलक दाखविण्यात आले. काँग्रेसचे सदस्य अधीर रंजन चौधरी यांनी सर्वप्रथम फलक दाखविला. त्यानंतर इतर विरोधी सदस्यांनी त्याचे अनुकरण केले. दुपारी दोननंतरही गदारोळाचे वातावरण कायम राहिल्याने अध्यक्षांनी कामकाज शुक्रवारपर्यंत तहकूब केले.

लवकरच दहा हजार इलेक्ट्रिक बसेस रस्त्यावर

प्रश्नोत्तराच्या तासात केंद्रीय रस्ते आणि परिवहन मंत्री नीतीन गडकरी यांनी लवकरच देशभरात 10 हजार इलेक्ट्रिक बसेस रस्त्यावर आणल्या जातील, अशी माहिती दिली. प्रदूषण टाळण्याबरोबरच इंधनावरचा खर्च वाचविण्यासाठी इलेक्ट्रिक गाड्या वापरणे ही काळाची गरज असून आपल्या मंत्रालयाने त्यासाठी विशेष प्रयत्न सुरु केले असल्याचे त्यांनी सांगितले. चारचाकी गाड्यांमध्ये पुढे बसणार्‍या लोकांसाठी एअरबॅग सक्तीचे आहे. अपघात समयी लोकांचा जीव वाचावा, याकरिता मागे बसणार्‍या लोकांसाठी गाडीत एअरबॅग बसविण्याच्या योजनेवर काम सुरु असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

हेही वाचा : 

Back to top button