मोठी बातमी : संजय राऊत यांच्या ईडी कोठडीत ८ ऑगस्टपर्यंत वाढ | पुढारी

मोठी बातमी : संजय राऊत यांच्या ईडी कोठडीत ८ ऑगस्टपर्यंत वाढ

पुढारी ऑनलाईन डेस्‍क : गोरेगावमधील पत्राचाळ पुनर्विकास घोटाळ्याप्रकरणी अटक करण्‍यात आलेले शिवसेना नेते व खासदार संजय राऊत यांच्या ईडी कोठडीत 8 ऑगस्टपर्यंत वाढ करण्यात आली आहे. आज त्यांची ईडी कोठडी संपल्यानंतर विशेष न्यायालयात पुन्हा एकदा सुनावणी घेण्यात आली. यावेळी न्यायालयाने त्यांच्या कोठडीत वाढ करण्यात आली.

न्यायालयात ईडीने संजय राऊत माहिती देत नाही, असा आरोप करीत त्यांच्या घरातून महत्वाची कागदपत्रे मिळाली. आतापर्यंत 1 कोटी 6 लाखांची माहिती मिळाली. वर्षा राऊत यांच्या खात्यातून एक कोटी आठ लाख रुपयांचे पैसे वळवल्याची माहिती आहे, हे पैसे का काढण्यात आले तसेच याची आणखी माहिती काढायची आहे, असा युक्तिवाद ईडीकडून न्यायालयात करण्यात आला होता. ईडीने आणखी 6 दिवसांची म्हणजेच 10 ऑगस्टपर्यंत कोठडीची मागणी केली होती. तर संबंधितांना आठ ऑगस्टपर्यंत हजर राहण्याचे समन्स बजावले आहे. तर संजय राऊत यांच्यावरील कारवाई राजकीय सूडबुद्धीने होत आहे असा युक्तिवाद राऊत यांच्या वकिलांनी केला. दोन्ही पक्षांचा युक्तिवाद ऐकल्यानंतर ईडीने संजय राऊत यांच्या कोठडीत वाढ केली.

ईडी कोठडीत एकच पंखा

ईडीच्या कोठडीत फक्त एकच पंखा आहे. त्यामुळे आपल्याला त्रास होत आहे. अशी तक्रार राऊत यांनी न्यायालयात केली आहे. केवळ एकच पंखा असल्याने माझा श्वास गुदमरतो आहे, अशी तक्रार राऊत यांनी केली आहे.

गेल्या वेळी न्यायालयात आठ दिवसांची कोठडी मागितली मात्र 4 दिवसांची कोठडी मिळाली होती…

पत्राचाळ प्रकरणी  संजय राऊत यांचा थेट संबंध आहे. तेच या प्रकरणाचे सूत्रधार आहेत. त्‍यांना विदेशी दौर्‍यासाठी प्रवीण राऊत यांच्‍याकडून पैसे मिळत असत.त्‍यांच्‍या मालमत्ताची व आर्थिक व्‍यवहारांची  सखाेल तपासणी करायची आहे. तसेच संजय राऊत चाैकशीला सहकार्य करत नाहीत. त्‍यांच्‍याकडून अनेक व्‍यवहारांची माहिती घेणे आवश्‍यक आहे. संजय राऊत हे साक्षीदारांवर दबाव आणण्‍याचा व पुराव्‍यांशी छेडछाड करण्‍याचा प्रयत्‍न करत आहेत, पुढील चाैकशीसाठी संजय राऊत यांना ८ दिवसांच्‍या कोठडीची मागणी  ‘ईडी’ च्‍या वकिलांनी केली होती. मात्र न्यायालयाने त्यावेळी त्यांना 4 ऑगस्टपर्यंत कोठडी सुनावण्यात आली होती.

रविवारी झाली होती सलग ९ तास चौकशी

रविवारी सकाळी ‘ईडी’च्‍या पथकाने संजय राऊत यांच्या मुंबईतील भांडुप येथील घरावर छापेमारी केली होती तब्‍बल ९ तासांच्‍या चौकशीनंतर त्‍यांना ताब्‍यात घेण्‍यात आले. यानंतर त्‍यांना घेवून ईडी पथक कार्यालयाकडे रवाना झाले. ईडी कार्यालयात त्‍यांची पुन्‍हा सलग चौकशी झाली. मध्‍यरात्री त्‍यांना अटक करण्‍यात आली होती. (Sanjay Raut ED custody)

सुमारे ०१ हजार ३४ कोटी रुपयांच्या घोटाळ्याचा आरोप

पत्राचाळ पुनर्विकास प्रकल्पात सुमारे ०१ हजार ३४ कोटी रुपयांच्या घोटाळ्याचा आरोप आहे. याप्रकरणी मनी लॉंड्रिंग कायद्यान्वये गुन्हा दाखल करून ईडी तपास करत आहे. पत्राचाळ पुनर्विकासाच्या पहिल्या टप्प्यांत संजय राऊत यांचे नीकटवर्तीय असलेल्या प्रवीण राऊत यांची गुरू आशीष कन्स्ट्रक्शन कंपनी सहभागी होती. पुढे ही कंपनी त्यातून बाहेर पडली. मात्र, या व्यवहारात कंपनीला मोठा फायदा झाला होता. प्रवीण राऊत यांना या व्यवहारात मिळालेल्या पैशांतील काही पैसे संजय राऊत यांच्या पत्नी वर्षा राऊत यांच्याही खात्यात वळविण्यात आल्याचा आरोप आहे. (Sanjay Raut ED custody)

घोटाळ्यातील पैशांतून वर्षा राऊत यांच्या नावाने दादर येथील फ्लॅट आणि अलिबाग येथील किहीम येथे भूखंडांची खरेदी करण्यात आल्याचा ठपका ठेवत ईडीने अशा ११.१५ कोटी रुपयांच्या मालमत्तांवर जप्तीची कारवाई केली आहे. याच अनुषंगाने ईडीने राऊत यांची यापूर्वी चौकशी केली होती. त्यानंतर ईडीने जुलै महिन्यात पुन्हा एकदा चार वेळा चौकशीसाठी समन्स जारी केले होते. यातील एका वेळी राऊत हे चौकशीला हजर राहिले. मात्र, अन्य समन्सला ते अनुपस्थित राहिले. अखेर ईडीने राऊत हे चौकशीला हजर न राहून सहकार्य करत नसल्याची नोंद करत रविवारी सकाळी राऊतत्यांच्या घरी छापेमारी केली होती.

Back to top button