एकनाथ शिंदेंच्या गुप्त दिल्लीवारीची चर्चा; मध्यरात्री अमित शहांसोबत खलबते | पुढारी

एकनाथ शिंदेंच्या गुप्त दिल्लीवारीची चर्चा; मध्यरात्री अमित शहांसोबत खलबते

नवी दिल्ली; पुढारी वृत्तसेवा : राज्यात सत्तांतर होऊन बरेच दिवस लोटले असताना अद्याप मंत्रिमंडळ विस्ताराचा मुहूर्त निघाला नसल्याने विरोधकांनी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांवर टीकेची झोड उठवली आहे. परंतु, आता मंत्रिमंडळ विस्ताराला वेग आल्याचे चित्र निर्माण झाले आहे. एकनाथ शिंदे यांनी २७ जुलैला मध्यरात्री केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. शिंदे यांचा बुधवारी रात्रीचा नियोजित दौरा रद्द करण्यात आल्याची माहिती अगोदर समोर आली होती. परंतु, त्याच रात्री साडे नऊ वाजता शिंदे दिल्लीसाठी रवाना झाले होते, असे कळतेय.

रात्री उशिरा दीड वाजता शिंदे यांनी शहा यांची भेट घेतली. उभय नेत्यांमध्ये तासभर चर्चा झाल्याचे कळतेय. मंत्रिमंडळ विस्तार आणि १ ऑगस्टला सर्वोच्च न्यायालयात शिवसेनेसंबंधी होणाऱ्या सुनावणी संदर्भात चर्चा झाल्याचे बोलल जात आहे. न्यायालयातील सुनावणीनंतर लगेच मंत्रिमंडळ विस्तार होण्याची शक्यता या गुप्त भेटीमुळे वर्तवली जात आहे. रात्री साडे तीन वाजता शिंदे परत मुंबई करीत रवाना झाल्याची माहिती समोर आली आहे. परंतु, यासंबंधी मुख्यमंत्री सचिवालयाकडून कुठलाही दुजोरा देण्यात आलेला नाही.

सत्तांतरानंतर पहिल्यांदा ८ जुलैला रात्री एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांनी अमित शहा यांची भेट घेत चर्चा केली होती. यानंतर आतापर्यंत शिंदे यांची ४ वेळा दिल्लीवारी केली. १९, २२ आणि २४ जुलैला मुख्यमंत्र्यांनी दिल्ली दौरा केला होता. परंतु, या दौऱ्यादरम्यान अमित शहा यांची भेट होऊ शकली नव्हती, अशी माहिती समोर आली आहे. दरम्यान, मंत्रिमंडळाच्या यादीला अंतिम स्वरूप देण्यासाठी शिंदे यांनी हा गुप्त दौरा केल्याचे कळतेय. शिंदे गटाकडून १८ मंत्रिपदाची मागणी करण्यात आली आहे. या अनुषंगाने देखील या भेटीत चर्चा झाल्याचे बोलले जात आहे.

हेही वाचलंत का ? 

Back to top button