Parliament Monsoon Session : लोकसभा, राज्यसभेच कामकाज सोमवारपर्यंत स्थगित | पुढारी

Parliament Monsoon Session : लोकसभा, राज्यसभेच कामकाज सोमवारपर्यंत स्थगित

पुढारी ऑनलाईन डेस्क : जुलैपासून सुरू झालेल्या संसदेच्या पावसाळी अधिवेशनात (Parliament Monsoon Session) गोंधळ सुरूच आहे. महागाई, बेरोजगारी, जीएसटी, अग्निपथ या मुद्यांवर चर्चेच्या मागणीवरून विरोधक गदारोळ करत आहेत. तर सत्ताधारी या मुद्यांवर चर्चा टाळत असल्याचे दिसत आहे. आजही संसदेच्या दोन्ही सभागृहात गदारोळ झाला. यानंतर दोन्ही सभागृहांचे कामकाज आधी दुपारी १२ वाजेपर्यंत आणि नंतर सोमवारपर्यंत तहकूब करण्यात आले आहे.

(Parliament Monsoon Session) विविध मुद्यांवरुन विरोधी पक्षांनी केलेल्या गदारोळामुळे संसदेचे सलग दहाव्या दिवसाचे कामकाज वाया गेले. वाढती महागाई, खाद्यान्नावरील जीएसटी कर, अग्निपथ योजना तसेच सत्ताधारी सदस्यांकडून काॅंग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी यांचा करण्यात आलेला कथित अपमान आदी मुद्यांवरुन विरोधी पक्षांनी उभय सदनात गदारोळ घातला. दरम्यान सोनिया गांधी यांनी माफी मागितल्याशिवाय लोकसभेचे कामकाज सुरळीतपणे चालू दिले जाणार नाही, असा इशारा भाजपचे खासदार निशिकांत दुबे यांनी दिला आहे.

लोकसभेत सकाळी अकरा वाजता कामकाजाला सुरुवात होताच विरोधी सदस्यांनी घोषणाबाजीला सुरुवात केली. यावेळी चार काॅंग्रेसी सदस्यांचे निलंबन मागे घेण्याची मागणी केली जात होती. विरोधकांच्या घोषणाबाजीला उत्तर देण्यासाठी भाजपच्या महिला खासदार आपापल्या आसनांवर उभा राहून प्रति घोषणा देत असल्याचेही चित्र दिसून आले. गदारोळामुळे कोण काय बोलत आहे, तेच ऐकू येत नव्हते.

दुपारच्या सत्रात भाजप खासदारांनी अधिर रंजन चैधरी यांच्याकडून करण्यात आलेल्या राष्ट्रपतींच्या अवमानाचा मुद्दा उपस्थित केला. सोनिया गांधी यांच्या निर्देशावरुन वारंवार राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचा अपमान केला जात असून जोवर सोनिया गांधी माफी मागत नाहीत, तोवर लोकसभेचे कामकाज सुरळीतपणे चालू दिले जाणार नाही, असे भाजपचे खासदार निशिकांत दुबे यांनी सांगितले. गदारोळामुळे लोकसभा अध्यक्षांना कामकाज प्रथम कामकाज दुपारी बारा वाजेपर्यंत आणि त्यानंतर सोमवारपर्यंत तहकूब करावे लागले.

हेही वाचलंत का ?

Back to top button