

पुढारी ऑनलाईन डेस्क : काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी (Sonia Gandhi) यांची सुरू असलेल्या ईडी चौकशीच्याविरोधात काँग्रेस आक्रमक झाली आहे. दिल्ली, मुंबईसह देशभरात काँग्रेस कार्यकर्त्यांनी आंदोलन सुरू केले आहे. दरम्यान, आज (दि. २७) सोनिया गांधी चौकशीच्या तिसऱ्या दिवशी अंमलबजावणी संचालनालयासमोर हजर झाल्या. त्यामुळे काँग्रेस खासदारांनी संसदेपासून विजय चौकापर्यंत मोर्चा काढला. तसेच यावेळी काँग्रेसच्या राज्यसभा खासदारांच्या निलंबनाच्या निषेधार्थ निदर्शने केली.
नॅशनल हेराल्ड प्रकरणी चौकशीसाठी काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी (Sonia Gandhi) बुधवारी अंमलबजावणी संचालनालयाच्या कार्यालयात पोहोचल्या. आज चौकशीची तिसरी फेरी होणार असून त्यांची चौकशी आज पूर्ण होऊ शकते, अशी माहिती अंमलबजावणी संचालनालयाच्या सूत्रांकडून मिळाली आहे. याबाबत सूत्रांनी सांगितले की, गेल्या दोन दिवसांत चौकशीदरम्यान सोनिया गांधी यांना ७० प्रश्न विचारण्यात आले आहेत. त्यांनी जास्त वेळ न घेता सर्व प्रश्नांची उत्तरे दिली आहेत. या प्रकरणी राहुल गांधी यांची यापूर्वीही चौकशी करण्यात आली आहे. त्यांची ५ दिवस चौकशी करण्यात आली आणि त्यांना सुमारे दीडशे प्रश्न विचारण्यात आले आहेत.
नॅशनल हेराल्ड वृत्तपत्र आणि यंग इंडियन प्रायव्हेट लिमिटेड यांच्याशी असलेल्या संबंधांबाबत सोनिया गांधींना प्रश्न विचारण्यात आल्याची माहिती आहे. सोनिया गांधी आणि राहुल गांधी दोघेही यंग इंडियनचे मोठे शेअर होल्डर असल्याने या दोघांनी दिलेली उत्तरे जुळू शकतात, असे एका अधिकाऱ्याने सांगितले.
नॅशनल हेराल्ड केस प्रकरणी सोनिया गांधी यांना समन्स बजावून ईडी कार्यालयात हजर राहण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार 21 जुलै रोजी सोनिया या ईडीच्या दिल्ली कार्यालयात दाखल झाल्या होत्या. त्यादिवशी त्यांची अडीच तास चौकशी करण्यात आली. त्यानंतर काल पुन्हा सोनिया यांची चौकशी झाली होती. दोन दिवसांच्या आठ तासाच्या चौकशीत ईडीने त्यांना जवळपास 75 प्रश्न विचारले. सोनिया यांनी 75 प्रश्नांची उत्तरे नोंदवली आहेत.
दरम्यान, सोनियां यांच्या ईडी चौकशीवरून संपूर्ण देशात काँग्रेसने तीव्र निदर्शने केली. काँग्रेस 21 तारखेला देशात मोठ्या प्रमाणात आक्रमक झाली होती. ठिकठिकाणी काँग्रेस कार्यकर्त्यांकडून आंदोलन करण्यात आले होते. त्यानंतर आज ईडीने पुन्हा चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश देण्यात आले होते.
हेही वाचलंत का ?