गोवा : डिचोलीत नेत्यांचा लागणार कस | पुढारी

गोवा : डिचोलीत नेत्यांचा लागणार कस

डिचोली;  पुढारी वृत्तसेवा :  डिचोली तालुक्यातील एकूण सतरा पंचायत विभागातील तसेच मये व साखळी या मतदारसंघातून तुल्यबळ लढती अपेक्षित आहेत. यावेळी मोठ्या संख्येने उमेदवार रिंगणात उतरले असल्याने आपापल्या समर्थकांना निवडून आणण्यासाठी तिन्ही आमदारांची दमछाक होणार असल्याची स्थिती आहे. ही निवडणूक पक्षीय पातळीवर होत नसल्याने पक्षीय कार्यकर्तेच मोठ्या प्रमाणात आमने-सामने ठाकणार आहेत.

पंचायत पातळीवर विकासाचे मुद्दे, गावच्या समस्या, बेरोजगार आदी अनेक प्रश्न चर्चेत आहेत. तालुक्यात सामाजिक सेवा निर्माण करणारे प्रकल्प उभारण्याकडे पंचायतीचा कल दिसून आलेला नाही. गटारे, इमारती उभारणे, रस्त्यांची कामे यासह नैसर्गिक जलस्रोतांचे काँक्रीटीकरण यावर पंचायती भर देताना दिसतात. त्यामुळे ग्रामीण विकासाला हवी तशी दिशा मिळत असल्याचे चित्र दिसत नाही.
एकच प्रभागात अनेक दावेदार निर्माण झाल्याने मूळ संकल्पना बाजूला ठेवून निवडणूक लढली जात आहे. त्यामुळे ग्रामीण गावातील विकासाच्या धोरणाकडे कुणाचीच नजर दिसत नाही. भाजप नेत्यांनी निवडणुकीत आपले मोठ्या प्रमाणात कार्यकर्ते तयार केले आहेत. मात्र, यातील अनेक कार्यकर्ते निवडणुकीच्या रिंगणात असल्याने नेमके कुणाला सहकार्य करावे, या चिंतेत नेते आहेत. तालुक्यातील 125 प्रभागातून तीनशेहून अधिक उमेदवारांनी अर्ज दाखल केले आहेत.

भारतीय जनता पक्षातर्फे पक्षीय पातळीवर पॅनल नसले तरी आपल्या मर्जीतील उमेदवारांना विजयी करण्यासाठी फिल्डिंग लावली जात आहे. प्रभागात एकाहून अधिक पक्षाचे उमेदवार आमने सामने असल्याने कार्यकर्त्यांची नेत्यांची गोची झाली आहे. त्यामुळे कोणाला झुकते माप असेल त्याकडेही लक्ष आहे

साखळी मतदारसंघातील कुडणे, न्हावेली, पाळी, वेळगे, सुर्ला, आमोणा पंचायत क्षेत्रातील अनेकांना आरक्षणाचा फटका बसला आहे काहीजण इतर प्रभागात नशिब अजमावण्याचा प्रयत्न करीत आहेत. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांचे अनेक समर्थक रिंगणात उतरले आहेत. आता मुख्यमंत्री डॉ. सांवत यांचे झुकते माप कुणाला मिळणार ते पाहावे लागेल.
काँग्रेसतर्फेही अंतर्गत चाचणी सुरू आहे. डिचोली मतदारसंघातून आमदार डॉ. चंद्रकांत शेट्ये यांचे अनेक समर्थक रिंगणात उतरले आहेत. त्यांनाही योग्य पद्धतीने ही निवडणूक हाताळावी लागत आहे

भाजप नेते राजेश पाटणेकर यांनी आपल्या परीने फिल्डिंग लावण्यासाठी प्रयत्न चालवले आहेत. नरेश सावळ ही सक्रिय झाल्याची चर्चा आहे. मये मतदारसंघात प्रेमेंद्र शेट यांच्या पुढाकाराने एक दोन उमेदवार बिनविरोध निवडून येण्याची शक्यता चर्चेत आहे. शेट यांनाही पक्षातील एकाहून अधिक उमेदवार रिंगणात असल्याने पक्षाची बाजू सांभाळत राजकीय चाल करावी लागणार आहे.
मये मतदार संघात चोडण, मये नार्वे, शिरगाव, कारपूर सर्वंण, वन मावलिंगे, कुडचिरे, पिळगाव या पंचायतीचा समावेश आहे. डिचोली मतदार संघात मुळगाव, साळ, लाटंबार्से, अडवलपाल, मेनकुरे आदी पंचायतीचा समावेश आहे.

आगामी दहा दिवस जोरदार प्रचार अपेक्षित आहे. गावाच्या प्रभागाच्या विकासाचे कोणते मुद्दे हे उमेदवार उपस्थित करून विकासाला चालना देण्याचा प्रयत्न करणार ते पाहावे लागेल. अनेक महिला उमेदवार रिंगणात उतरले आहेत. अनेक विद्यमान पंचाचे पत्ते कट करण्यात आल्याने नाराजीही आहे. आरक्षणात घोळ घातल्याने ही नाराजीचा सूर आहे.

विकासाची द‍ृष्टी असलेले उमेदवार हवेत
मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या स्वप्नातील ‘स्वयंपूर्ण गोवा’ साकारण्यासाठी अनेक योजना प्रत्येक प्रभागातून राबविण्याची गरज आहे. मात्र, त्यासाठी विकासाची दृष्टी असलेले उमेदवार हवेत. आपल्या प्रचाराचा कोणता अजेंडा घेऊन ही मंडळी रिंगणात उतरतात त्यावर त्यांची दूरदृष्टी ठरणार आहे. हे निश्चित आगामी पंधरा दिवस डिचोली तालुक्यातील प्रत्येक प्रभाग ढवळून निघणार हे निश्चित.

Back to top button