गोव्याला मंकीपॉक्सचा धोका नाही | पुढारी

गोव्याला मंकीपॉक्सचा धोका नाही

पणजी;  पुढारी वृत्तसेवा :  मंकीपॉक्समुळे मृत्यू होण्याचे प्रकार फक्‍त आफ्रिकन देशांमध्ये घडले आहेत. गोव्यात या रोगाचा शिरकाव झालेले नाही. आरोग्य खात्याने या रोगाच्या नियंत्रणाची तयारी केली आहे. त्यामुळे नागरिकांनी मंकीपॉक्सचा धसका घेण्याची गरज नाही, असा दावा आरोग्य खात्याच्या सांसर्गिक रोग (आयडीएसपी) विभागाचे प्रमुख डॉ. प्रशांत सूर्यवंशी यांनी केला. येथील आरोग्य संचालनालयाच्या सभागृहात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

मंकीपॉक्सला जागतिक आरोग्य संघटनेने आरोग्य आणीबाणी म्हणून जाहीर केले आहे. या आजाराचे भारतात केरळमध्ये तीन व दिल्लीत एक असे एकूण चार रुग्ण आढळले आहेत. जगातील 70 देशांमध्ये 16 हजार मंकीपॉक्सचे रुग्ण असल्याची सध्या नोंद आहे. यामुळे जे 12 मृत्यू झालेले आहे ते सर्व आफ्रिकन देशातील आहे. सध्यातरी गोव्याला चिंता करण्याची गरज नाही, असे डॉ. सूर्यवंशी म्हणाले.
लोकांनी या आजाराबाबत काळजी करण्याची गरज नाही. मात्र तो संसर्गिक रोग असल्याने सतर्कता हवीच. त्वचेवर फोड येणे, ताप येणे, शरीर अशक्त होणे आदी याची लक्षणे असल्याचे सांगून मंकीपॉक्स झाल्यानंतर पहिले तीन ते सात दिवस त्याचा त्रास जास्त असतो. त्यानंतर 21 दिवसापर्यंत हा रोग वाढू शकतो, त्यांनी सांगितले.

संसर्ग झालेल्यासोबत संबंध प्रस्थापित करणे, चुंबन घेणे घातक ठरू शकते. संसर्गित व्यक्तीच्या समोर राहून श्वास घेणे याद्वारे या आजाराचा संसर्ग होण्याची शक्यता असते. नागरिकांनी कोरोना नियंत्रणासाठी ज्या नियमावलीचे पालन केले त्याच नियमाचे पालन मंकीपॉक्स नियंत्रणासाठी उपयुक्त आहेत, असे डॉ. सूर्यवंशी म्हणाले.

सरकारी इस्पितळात राखीव बेड
आरोग्य खात्याने गोवा वैद्यकीय महाविद्यालय बांबोळी इस्पितळासह दोन्ही जिल्हा इस्पितळे, दोन्ही उपजिल्हा इस्पितळे, सामाजिक केंद्रे व कासावली व चिखली येथील प्राथमिक आरोग्य केंद्रे येथे प्रत्येकी दोन बेड मंकपॉक्स रुग्णासाठी राखीव ठेवल्याचे डॉ. सूर्यवंशी यांनी सांगितले. या आजाराची लक्षणे दिसल्यास त्यांचे नमुने तपासून सदर व्यक्ती बाधित आढळल्यास त्याच्यावर उपचार केले जातील, असेही त्यांनी सांगितले.

Back to top button