शिवसेना आमचीच! मान्यतेसाठी शिंदे गटाकडून केंद्रीय निवडणूक आयोगाला पत्र | पुढारी

शिवसेना आमचीच! मान्यतेसाठी शिंदे गटाकडून केंद्रीय निवडणूक आयोगाला पत्र

नवी दिल्ली; पुढारी ऑनलाईन : शिवसेनेच्या १२ बंडखोर खासदारांनी स्वतंत्र गट स्थापन केल्यानंतर आता एकनाथ शिंदे यांच्या गटाकडून निवडणूक आयोगाला एक पत्र देण्यात आले आहे. त्यात शिंदे गटाला शिवसेना म्हणून मान्यता देण्याची मागणी करण्यात आली आहे. निवडणूक आयोगाला लिहिलेल्या पत्रात शिंदे यांच्या गटाने म्हटले आहे की, शिवसेनेच्या बहुसंख्य नेत्यांनी एकत्र येऊन नवीन कार्यकारिणी स्थापन केली आहे.

दरम्यान, उद्धव ठाकरेंच्या गटाने आधीच निवडणूक आयोगासमोर एक कॅव्हेट दाखल केले आहे. ज्यात कोणत्याही पक्षाने सेनेच्या संदर्भात कोणतीही याचिका दाखल केली असल्यास त्यावर सुनावणी घेण्यास सांगितले आहे. सुनावणीआधीच कोणताही आदेश किंवा निर्णय देऊ नका, अशी विनंती ठाकरे गटाने निवडणूक आयोगाकडे केली आहे.

शिवसेना खासदारांचा एक गट सोमवारी एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीला उपस्थित होता. ही बैठक व्हर्च्युअल पद्धतीने झाली. शिवसेनेच्या आमदारांपाठोपाठ लोकसभेतील खासदारांनी देखील पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या विरुद्ध बंड पुकारल्याने आता लोकसभेच्या संसदीय पक्षातही उभी फूट पडली आहे. राहुल शेवाळे यांना शिवसेनेचे नवे गटनेते म्हणून लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी मंगळवारी मान्यता दिली.

लोकसभा अध्यक्षांचा हा निर्णय उद्धव ठाकरे गटासाठी धक्कादायक मानला जात आहे. शिंदे गटाला अधिकृत मान्यता मिळाल्यानंतर या गटाने लोकसभेतील शिवसेना कार्यालय ताब्यात घेण्यासाठी हालचाली सुरू केल्या आहेत. बिर्ला यांना लिहिलेल्या पत्रात कार्यालयाचा ताबा देण्याची मागणी करण्यात आली आहे. शिवसेनेचे १२ खासदार मंगळवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना जाऊन मिळाले. या १२ जणांनी स्वतंत्र गटाची स्थापना स्थापना करीत लोकसभेच्या गटनेतेपदी राहुल शेवाळे यांची, तर प्रतोदपदी भावना गवळी यांची निवड केली. या गटास लोकसभेत शिवसेनेचा स्वतंत्र गट म्हणून मान्यता द्यावी, असे पत्र त्यांनी लोकसभाध्यक्ष ओम बिर्ला यांना दिले.

शिंदे गटाच्या प्रतोद म्हणून व्हिप काढण्याचा अधिकार पूर्वीप्रमाणेच भावना गवळी यांच्याकडे असेल. मात्र लोकसभेतील गटनेता आम्ही बदलला, असे या गटाकडून सांगण्यात आले. लोकसभाध्यक्षांची भेट घेण्यापूर्वी स्वतंत्र गट स्थापन करणार्‍या १२ खासदारांनी मंगळवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेऊन त्यांच्याशी चर्चा केली. यावेळी झालेल्या बैठकीत स्वतंत्र गट स्थापन करण्यात आला. बैठकीत खासदार धैर्यशील माने, हेमंत गोडसे, हेमंत पाटील, कृपाल तुमाने, श्रीरंग बारणे, श्रीकांत शिंदे, भावना गवळी, प्रतापराव जाधव, संजय मंडलिक, सदाशिव लोखंडे, राजेंद्र गावित उपस्थित होते.

 हे ही वाचा :

Back to top button