नगर : घारगाव-कोठे रस्त्यावर पसरले खड्ड्यांचे साम्राज्य | पुढारी

नगर : घारगाव-कोठे रस्त्यावर पसरले खड्ड्यांचे साम्राज्य

बोटा, पुढारी वृत्तसेवा : संगमनेर तालुक्यातील पठार भागात गेली पाच ते सहा दिवस वरूण राजाची कृपादृष्टी झाली. पाऊस मोठ्या प्रमाणावर बरसला, परंतु घारगाव ते कोठे बु, पिंपळदरी रस्त्यावर आधीच खड्ड्यांचे साम्राज्य निर्माण झाले होते, त्यात पावसाने रस्त्यावर चिखल साचल्याने या रस्त्याची अक्षरशः दयनीय अवस्था झाली आहे. रस्त्यात ये- जा करणारे प्रवासी घसरून पडत असल्याच्या घटना घडत आहेत.

घारगाव कोठे बु. रस्त्यालगत अतिक्रमणे व वाढलेल्या झाडांमुळे या रस्त्याला साईटपट्टी देखील शिल्लक राहिली नसल्याचे दिसते. रस्ता अरुंद झाला आहे. दोन गाड्या या रस्त्यावर पास होत नसल्याच्या व्यथा येथील वाहनचालक प्रवासी व्यक्त करीत आहे.
रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यांमधे गाळ आणि चिखलाचे साम्राज्य निर्माण झाल्याने छोट्या वाहन चालकांना मोठ्या खस्ता खात प्रवास करावा लागत असल्याचे दुःख प्रवासी नागरिक व्यक्त करीत आहेत. या रस्त्याची लवकरात लवकर रुंदीकरण करून दुरुस्ती करावी.अन्यथा लोकशाही मार्गाने उपोषणे तसेच आंदोलन करण्याचा इशारा येथील नागरिकांनी दिला आहे.

अनेक वर्षांपासून घारगाव- कोठे बुद्रुक रस्ता दुरुस्त झाला नाही. कामे होत नसल्याने आम्ही बदल केला. डॉ. किरण लहामटे यांना निवडून दिले, परंतु त्यांनीही हे काम केले नाही. रस्ते दुरुस्तीसह रुंदीकरण करावे, अन्यथा आम्ही लोकशाही मार्गाने या मागणीसाठी आंदोलन करू.

                                                                     – संपत जाधव, माजी सरपंच कोठे बु.

घारगाव- कोठे बुद्रुक रस्त्याची दयनीय अवस्था झाली आहे. येथील आमदार, जि. प.सदस्य, पं. समिती सदस्य, ग्रामपंचायतींनी या रस्त्याची दखल घेऊन सार्वजनिक बांधकाम विभागाकडे दुरुस्तीसह रुंदीकरणाची मागणी करावी. यातून भावी काळात या रस्त्यामुळे होणारे अनर्थ टाळतील.

                                                                                – रंगनाथ भालके, ग्रामस्थ

Back to top button