ज्ञानवापी मशीद परिसरात धार्मिक विधीला परवानगी द्या : सर्वोच्च न्यायालयात याचिका | पुढारी

ज्ञानवापी मशीद परिसरात धार्मिक विधीला परवानगी द्या : सर्वोच्च न्यायालयात याचिका

नवी दिल्ली; पुढारी वृत्तसेवा : ज्ञानवापी मशीद परिसरात सर्वेक्षणादरम्यान ज्या ठिकाणी शिवलिंग आढळले होते; त्या ठिकाणी धार्मिक विधी करण्याची परवानगी द्यावी, अशी मागणी करणारी याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल करण्यात आली आहे. कृष्ण जन्मभूमि मुक्ती दलाचे अध्यक्ष राजेश मणी त्रिपाठी यांनी ही याचिका दाखल केली आहे. सर्वेक्षणादरम्यान मिळालेले ‘शिवलिंग’ न्यायालयाने आदेश पारित करीत संरक्षित केले आहे. पंरतु, शिवलिंग संरक्षित करण्यात आल्यानंतर देखील भाविकांना, शिवभक्तांना येथे पुजा-अर्चना करण्याची परवानगी देण्यात आलेली नाही, असा युक्तीवाद करण्यात आला आहे.

१७ मे २०२२ रोजी दिलेला अंतरिम आदेश सर्वोच्च न्यायालयाने कायम ठेवत शिवलिंग आढळलेल्या ठिकाणाला संरक्षित करण्याचे तसेच मुस्लिम बांधवांच्या नमाज पठण तसेच इतर धार्मिक अनुष्ठानावर कुठलीही बंदी न घालण्याचे निर्देश प्रशासनाला दिले होते. मशीद परिसरात देवी-देवतांची पूजा करण्याचा अधिकार देण्यात यावा, अशी मागणी करणाऱ्या हिंदू महिलांची याचिका सर्वोच्च न्यायालयाने कनिष्ठ न्यायालयाकडे हस्तांतरित केली होती. या प्रकरणावर कनिष्ठ न्यायालयात सुनावणी सुरू आहे. आता नव्याने पुजेच्या अधिकारासंबंधी याचिका दाखल करण्यात आल्याने सर्वोच्च न्यायालयाच्या सुनावणीकडे लक्ष लागले आहे.

हेही वाचलंत का ? 

Back to top button