Monkeypox | कोरोनाच्या तुलनेत मंकीपॉक्स मुलांसाठी जीवघेणा, लक्षणे ‘चिकनपॉक्स’सारखी, ‘एम्स’ची माहिती

Monkeypox | कोरोनाच्या तुलनेत मंकीपॉक्स मुलांसाठी जीवघेणा, लक्षणे ‘चिकनपॉक्स’सारखी, ‘एम्स’ची माहिती

नवी दिल्ली; केरळमध्ये मंकीपॉक्सचा (Monkeypox) पहिला रुग्ण आढळून आल्याने देशातील आरोग्य यंत्रणा सतर्क झाली आहे. दरम्यान, मंकीपॉक्स विषाणूची संसर्गक्षमता खूपच कमी आहे. पण कोरोनाच्या तुलनेत मंकीपॉक्स मुलांसाठी जीवघेणा ठरू शकतो, असे अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थेच्या (एम्स) तज्ज्ञांनी म्हटले आहे.

एम्सच्या मेडिसिन विभागाचे अतिरिक्त प्राध्यापक पियूष रंजन यांनी सांगितले आहे की, मंकीपॉक्स विषाणूचा संसर्ग प्राण्यांपासून माणसांमध्ये जवळच्या संपर्काने तसेच संक्रमित लोकांशी समोरासमोर संपर्क आल्याने होतो. मंकीपॉक्सची लक्षणे ही स्मॉलपॉक्स आणि चिकनपॉक्ससारखी असल्याची माहिती त्यांनी दिली आहे.

"सुरुवातीला रुग्णाला ताप येतो. १-५ दिवसांनंतर रुग्णाच्या चेहऱ्यावर, तळव्यावर पुरळ उठू शकतात. तसेच डोळ्याच्या सर्वात बाहेरच्या भागावर (cornea) पुरळ उठू शकतात ज्यामुळे अंधत्व येते, असेही त्यांनी पुढे म्हटले आहे.

केरळमध्ये मंकीपॉक्सचा (Monkeypox disease) पहिला रुग्ण आढळून आल्याच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाने मंकीपॉक्सचा संसर्ग रोखण्यासाठी मार्गदर्शक तत्त्वे जारी केली आहेत. सर्व आंतरराष्ट्रीय प्रवाशांनी त्वचेवरील जखमा तसेच आजारी लोकांशी जवळचा संपर्क टाळावा. मृत किंवा जिवंत जंगली प्राणी (उदा. उंदीर, खारुताई) आणि इतरांशीही संपर्क टाळावा, असे आरोग्य मंत्रालयाने म्हटले आहे.

आफ्रिकेतील वन्य प्राण्यांपासून बनवलेली उत्पादने, जसे की क्रीम, लोशन आणि पावडर वापरू नयेत. आजारी लोकांनी वापरलेली दूषित कपडे, बिछाना, आरोग्य सेवेसाठी वापरण्यात आलेल्या वस्तू तसेच संक्रमित प्राण्यांच्या संपर्कात आलेल्या वस्तू वापरणे टाळा, असे मंत्रालयाने म्हटले आहे. जर ताप आणि पुरळ अशी मंकीपॉक्सची लक्षणे दिसून आल्यास जवळच्या आरोग्य सेवेशी सल्लामसलत करा. विशेषत: ज्या भागात मंकीपॉक्सचे रुग्ण आढळून आले आहेत. तेथील लोकांनी विशेष काळजी घ्यावी.

भारतामध्ये पहिला मंकीपॉक्स संक्रमित रूग्ण आढळून आला आहे. हा संक्रमित रूग्ण केरळ या राज्यातील असून, चार दिवसांपूर्वी तो यूएईतून भारतात आला असल्याची माहिती समोर आली आहे. आत्तापर्यंत या रूग्णाच्या संपर्कात ११ जण आले असून, त्या सर्वांना निरीक्षणाखाली ठेवण्यात आले आहे. केरळमधील आरोग्य यंत्रणेला सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

जगातील काही देशांत 'मंकीपॉक्स' (Monkeypox disease) या विषाणूचा संसर्ग झालेले रुग्ण सापडत आहेत. हा विषाणू प्रामुख्याने मध्य आफ्रिका आणि पश्‍चिम आफ्रिकेच्या उष्णकटिबंधीय जंगलांमध्ये आढळतो.

मंकीपॉक्स म्हणजे काय?

मंकीपॉक्स अतिशय दुर्मीळ आजार आहे. देवीचा रोग ज्या विषाणूमुळे होतो, त्याच विषाणूचा हा एकप्रकारे उपप्रकार असल्याचे तज्ज्ञ सांगतात. संसर्ग झालेल्या रुग्णाशी जवळचा संबंध आल्यास हा रोग वेगाने पसरतो.

लक्षणांच्या तीव्रतेवर नियंत्रण ठेवण्यासाठी, ती कमी करण्यासाठी डॉक्टरांच्या सल्ल्याने औषधोपचार देण्यात यावा. दुय्यम बॅक्टरील संसर्ग असल्यास त्यावर योग्य ते उपचार करण्यात यावेत. पुरेशा प्रमाणात द्रव्ये द्यावीत, जेणेकरून शरीरात पाण्याची कमतरता येणार नाही. पोषक आहार देण्यात यावा.

लक्षणे काय?

मंकीपॉक्सची लागण झाल्यानंतर शरीरावर पुरळ येतात. सुरुवातीच्या लक्षणांमध्ये ताप, डोकेदुखी, सूज, पाठदुखी, स्नायूंमध्ये वेदना, अस्वस्थपणा यांचा समावेश होतो. रुग्ण बरा झाल्यानंतरही शरीरावर डाग तसेच राहतात.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news