विजय मल्ल्या यांना सर्वोच्च न्यायालयाचा दणका, चार महिन्‍यांचा तुरुंगवास | पुढारी

विजय मल्ल्या यांना सर्वोच्च न्यायालयाचा दणका, चार महिन्‍यांचा तुरुंगवास

नवी दिल्ली : पुढारी वृत्तसेवा
देश सोडून पळालेले तत्कालीन लिकर किंग विजय मल्ल्या यांना सर्वोच्च न्यायालय सोमवारी (दि. ११ )  न्‍यायालयाच्‍या अवमान प्रकरणी चार महिन्‍यांचा तुरुंगवास आणि दाेन हजार रुपयांच्‍या दंडाची शिक्षा ठाेठावली आहे. किंगफिशर एअरलाईन्सचे दिवाळे काढून मल्ल्या यांनी विदेशात पळ काढला होता. बँकांची सुमारे 9 हजार कोटी रुपयांची फसवणूक केल्याचा गंभीर आरोप मल्ल्या यांच्यावर आहे.

काय आहे प्रकरण ?

न्यायालयीन आदेश धाब्यावर बसवून आपल्या मुलांच्या नावावर 4 कोटी डॉलर्स पाठविल्याच्या प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने मल्ल्या यांच्याविरोधात अवमानना खटला चालविला होता. या खटल्यात मल्ल्या यांच्याविरोधातील आरोप सिद्‍ध झाल्यानंतर न्यायालयाने किती शिक्षा द्यायची याबाबतचा निकाल राखून ठेवला होता.

विजय मल्ल्या यांच्यावरील न्यायालयाचा अवमान केल्याचा आरोप 2017 साली सिध्द झाला होता. या निकालाचा पुनर्विचार करण्यात यावा, अशा विनंतीची याचिका मल्ल्याने सर्वोच्च न्यायालयात दाखल केली होती. याचिका सर्वोच्च न्यायालयाने 2020 साली फेटाळून लावली होती. त्यानंतर गत फेब्रुवारी महिन्यात न्यायालयाने दोन आठवड्यात स्वतः हजर राहून बाजू मांडण्याचे निर्देश मल्ल्या यांना दिले होते. आज याप्रकरणी त्‍यांना चार महिन्‍याचा कारावास आणि दाेन हजार रुपयांच्‍या दंडाची शिक्षा सुनावण्‍यात आली.

 

Back to top button