मावळ : पोल्ट्री व्यवसायासाठी जिल्हा बँक देणार कर्ज’ | पुढारी

मावळ : पोल्ट्री व्यवसायासाठी जिल्हा बँक देणार कर्ज’

वडगाव मावळ : मावळ तालुक्यातील 100 पोल्ट्री व्यावसायिकांना पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकच्या वतीने स्वतंत्रपणे पोल्ट्री व्यवसाय करण्यासाठी कर्ज उपलब्ध करून देणार असल्याची माहिती बँकेचे संचालक माऊली दाभाडे यांनी दिली. शेतीबरोबरच शेतकर्‍यांनी शेतीपुरक व्यवसाय करावेत म्हणून पुणे जिल्हा बँकेने शेतीपुरक व्यवसायांना विशेष कर्ज धोरण सुरू केलेले आहे.

शेतकर्‍यांनी पोल्ट्री, डेअरी, पॉलीहाऊस नर्सरी, कृषी पर्यटन आदी व्यवसाय करावेत असे आवाहन दाभाडे यांनी केले आहे.
बँकेने पोल्ट्री व्यवसायासाठी नुकतेच सुधारित धोरण जाहीर केले आहे. शेतकर्‍यांना नविन पोल्ट्री सुरू करण्यासाठी कर्ज, स्वयंचलित(अ‍ॅटोपोल्ट्री) पोल्ट्री उभारण्यासाठी कर्ज तसेच, ओपण पोल्ट्री फार्मसाठी भांडवलासाठी कर्ज, पक्षी घेण्यासाठी कर्ज, खाद्य व औषधे घेण्यासाठी कर्ज उपलब्ध करून दिले जाणार आहे असेही दाभाडे यांनी सांगितले.

ओपन पोल्ट्री फार्म सुरू करण्यासाठी पक्षी घेण्यासाठी व खाद्य तसेच औषधे यासाठी विशेष मार्गदर्शनही केले जाणार आहे. याशिवाय पक्षी विक्री(मार्केटिंग) करण्यास सहकार्य केले जाणार आहे. फार्मरनी पोल्ट्री कंपन्यांशी करार पद्धतीने पोल्ट्री व्यवसाय करण्यापेक्षा स्वतःचा स्वतंत्र पोल्ट्री व्यवसाय करावा असे आवाहन दाभाडे यांनी केले.

Back to top button